चिरोली-चिमूर लोकसभेची जागा 
Latest

गडचिरोली-चिमूर लोकसभेची जागा मित्रपक्षाला नको; भाजप कार्यकर्त्यांचा इशारा

निलेश पोतदार

गडचिरोली, पुढारी वृत्‍तसेवा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र भाजपचा बालेकिल्ला असून, या क्षेत्राची जागा कुठल्याही परिस्थितीत महायुतीच्या मित्रपक्षांना न देता ती भाजपला द्यावी, अशी मागणी आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. यामुळे महायुतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.

२००९ मध्ये तत्कालिन चंद्रपूर आणि चिमूर या दोन लोकसभा क्षेत्रांचे विभाजन करुन गडचिरोली-चिमूर हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. चंद्रपूरमधून हंसराज अहीर, तर चिमूरमधून महादेवराव शिवणकर आणि नामदेवराव दिवटे अनेकदा भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. गडचिरोली-चिमूर या नव्या मतदारसंघातून अशोक नेते दोन वेळा निवडून आले. एकूणच हा मतदारसंघ मागील ३० वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. जिल्हा परिषद आणि नगर परिषदांवरही भाजपने सत्ता प्रस्थापित केली आहे. अशा परिस्थितीत ही जागा महायुतीच्या मित्रपक्षाला देणे योग्य नाही. भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला तिकिट द्या, पण मित्रपक्षाला नको, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. विशेष म्हणजे, विद्यमान खासदार अशोक नेते हे सक्षम उमेदवार असल्याचेही काही भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आजची पत्रकार परिषद खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी झाली. या पत्रकार परिषदेकडे भाजपच्या अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. एकीकडे कार्यकर्त्यांनी मित्रपक्षाला तिकिट नको असे सांगितले असले, तरी भाजपकडून नवख्या उमेदवाराच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. अशा स्थितीत भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि मित्रपक्षांशी असलेला संघर्ष उघड झाल्याचे दिसून येत आहे.

पत्रकार परिषदेला भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, चिमूर येथील भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्याम हटवादे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, दामोदर अरिगेला, माजी जिल्हा परिषद सदस्य रंजिता कोडापे, लता पुंघाटे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT