Latest

Maharashtra politics | भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब! आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी काल रविवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट करत दिली आहे. राज्यात आगामी सर्व निवडणुका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय या बैठकीत घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. (Maharashtra politics)

महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

"कृषी, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे. सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शहा यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली." असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे म्हटले आहे. (Maharashtra politics)

दीर्घ काळापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार तसेच राज्याशी संबंधित विविध प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत खलबते केली. रात्री साडेदहा वाजता सुरु झालेली ही बैठक पावणे बारा वाजता संपली.

गतवर्षीच्या जूनमध्ये राज्यात सत्तापालट झाला होता व शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले होते. मात्र सत्ता संघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नव्हता. अलीकडेच न्यायालयाने सत्ता संघर्षावर निकाल दिलेला आहे. त्यामुळे पुढील काही काळात मंत्रिमंडळ विस्तार अटळ मानला जात आहे. अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

गतवर्षी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत मोजक्याच आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यामुळे कोणतेही पद न मिळालेल्या आमदारांमध्ये चलबिचल सुरु असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री शिंदे यांचे रविवारी सायंकाळी दिल्लीत पोहोचले. त्यानंतर ते अमित शहा यांच्या निवासस्थानी गेले. दुसरीकडे फडणवीस हेही गृहमंत्र्यांच्या घरी पोहोचले. यानंतर वरील नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर शिवसेना आणि भाजपला किती जागा दिल्या जाणार, तर मंत्रीपदाची लॉटरी कोणा-कोणाला लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT