पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय जनता पक्षाने आज हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यात सत्ता आली तर समान नागरी कायदा लागू करु, असे भाजपने जाहीरनाम्यात म्हटलं आहे. यासाठी एक समिती बनवण्यात येईल. या समितीच्या सूचनांच्या आधारावर समान नागरी कायदा लागू केला जाईल.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा उपस्थितीत भाजपने हिमाचल प्रदेशसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. शेतकरी आणि तरुणांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. सत्ता स्थापन केल्यास किसान सन्मान निधीमध्ये ३००० रुपयांची वाढ करण्यात येईल. आठ लाखांपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन भाजपने दिले आहे.
हिमाचल प्रदेशच्या जनतेने संधी दिल्यास ५ नवी मेडिकल कॉलेज सुरू करणार, शहिदांना मिळणाऱ्या मदतीमध्ये वाढ करण्यात येईल, असेही भाजपने म्हटले आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनींचा सर्व्हे करण्यात येईल आणि बेकायदेशीर वक्फ बोर्डांवर कारवाई करण्यात येईल, असेही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे.