उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांनी बारामतीचा विकास कसा केला ते पाहून असाच प्रयोग आपापल्या मतदारसंघांत करण्यासाठी भाजपची धडपड सुरु आहे. अर्थात बारामतीच्या धरतीवर त्यांना देशात विकास साधायचा असेल तर त्यांनी खुशाल बारामती दौरा करावा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या 'मिशन बारामती'ची खिल्ली उडवली.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दौर्यावर सध्या जयंत पाटील आहेत. सकाळी पदाधिकार्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार हुशार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण बारामती दौर्यावर आल्यानंतर नक्कीच ते देशात वाढलेली महागाई, पेट्रोल, गॅस, डिझेलचे वाढलेले दर याबाबतची माहिती त्यांना विचारतील.
अर्थमंत्री सीतारामण यांनाही या वाढत्या महागाईची कारणे मतदारांना द्यायची असावीत. अन्नधान्य, कपडे यावर पहिल्यांदाच लागलेला जीएसटी यावरही त्या बारामतीकर मतदारांना माहिती देतील, असा टोला लगावला. विकासाची दिशा, धोरण भाजपकडे नाही. त्यामुळेच या पक्षाचे नेते खा. पवार यांच्या दृरदृष्टीने विकसीत झालेल्या बारामतीचे दौरे करुन विकासाचे नेमके मॉडेल जाणून घेत आहेत.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. सरकार स्थापन होवून 3 महिने होत आहेत. तरीही राज्यातील शेतकरी, सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या सरकारकडे वेळ नाही. केवळ सर्वोच्च न्यायालयातील केस चालविणे, 40 आमदार फुटणार तर नाहीत ना यादृष्टीने तजबीज करणे, शिवसेनेवर हक्क सांगणे यातच हे सरकार वेळ घालवत आहे. याची मोठी किंमत मात्र वेदांतासारखे मोठे प्रकल्प राज्याबाहेर जाऊन महाराष्ट्राला चुकवावी लागत आहे. मुख्यमंत्री शिंदे हे भाजपला घाबरत असल्याने ते गेलेला वेदांता प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याबाबत बोलत नाहीत.
शरद पवारांची भीती आहे…
पत्राचाळ घोटाळ्यात शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत पाटील म्हणाले, की भाजपला राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी भीती असल्याने ते पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर सातत्याने खोटेनाटे आरोप करीत असतात. त्यांच्या आरोपांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही. असे ते म्हणाले.
हेही वाचा