पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याची माहिती लपविल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना या प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे. फडणवीस यांनी दाखल केलेल्या 2014 मधील विधानसभा निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याच्या प्रकरणी न्यायालयाने फडणवीस यांना निर्दोष ठरविले आहे. हा फडणवीस यांच्यासाठी मोठा दिलासा असून विरोधकांना मोठा धक्का मानला जात आहे. (Devendra Fadnavis)
यापूर्वी मंगळवारी होणारी सुनावणी 8 सप्टेंबररोजी होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर या प्रकरणी राजकीय वर्तुळात निकालाची उत्सुकता ताणली गेली होती. विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात दोन गुन्ह्यांची नोंद नजरचुकीने राहून गेल्याचा युक्तिवाद फडणवीस यांच्या वकिलाने यापूर्वीच केला आहे, हे विशेष. तक्रारकर्त्यांनी निदर्शनास आणून दिलेल्या गुन्ह्यापेक्षा गंभीर गुन्हे आम्ही निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याने गुन्हे लपविण्याचा उद्देश नव्हता. हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्या नंतर प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने ते मान्य करीत फडणवीस यांना दिलासा दिला. (Devendra Fadnavis)
फडणवीस यांनी ऑनलाइन पद्धतीने यावेळी सहभाग घेत निकालावर समाधान व्यक्त केले. यासंदर्भात दोन्ही बाजूकडील युक्तिवाद यापूर्वीच पूर्ण झाल्याने या प्रकरणाचा निकाल मंगळवारी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. याचिकाकर्ते अॅड सतीश उके यांनी दोन गुन्हे लपविल्याची तक्रार केली होती. फडणवीस यांच्या २०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात दोन गुन्हे नमूद न केल्याप्रकरणी हा न्यायालयीन लढा सुरु होता.
हेही वाचा