पुढारी ऑनलाईन: कार चालकाला हेल्मेटसाठी दंड, सीट बेल्ट लावला नाही म्हणून दुचाकीस्वाराला दंड झाल्याची अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. मात्र उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यात अशी घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. औरेया आरटीओने सायकल चालवणाऱ्या तरुणाला 1.51 लाख रुपये रोड टॅक्स भरण्याची नोटीस पाठवली आहे. ही नोटीस युवकाच्या वडिलांनी स्वीकारली. वडील वॉचमन असून ते सायकल चालवतात. ही नोटीस वाचल्यानंतर लोकांनाही धक्का बसला आहे.
दिबियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेहूद गावात राहणाऱ्या सुधीरचे वडील सुरेश चंद्र हे एका धर्मशाळेत वॉचमनचे काम करतात. तो एका साध्या घरात कुटुंबासह राहतो तसेच तो आई-वडिलांवर अवलंबून आहे. सर्व ठिकाणी तो आणि त्याचे वडील सायकलवरूनच फिरतात. त्याच्या घरी कुठलीही कार किंवा बाईक नाही. सहाय्यक विभागीय परिवहन कार्यालयाने त्याला 1,51,140 रुपये रोड टॅक्स भरण्याची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे पीडितेच्या नातेवाइकांमध्ये भीती पसरली असून लोकांकडूनही या माहितीनंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नोटीसमध्ये जून 2014 ते सप्टेंबर 2021 पर्यंत मोटार वाहन कर भरण्याचे म्हटले आहे.
सुरेश चंद्र यांना दोन दिवसांपूर्वी 16 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायद्यांतर्गत एआरटीओ औरैया यांनी पोस्टाद्वारे पाठवलेली नोटीस प्राप्त झाली. इंग्रजी न वाचता येणाऱ्या सुरेश यांनी शेजाऱ्यांकडून नोटीस वाचून घेतली तेव्हा कळले की, त्याचा १६ वर्षांचा मुलगा सुधीर याने गाडीचा कर न भरल्याने त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. हे पाहून सर्वजण थक्क झाले. सुरेश यांनी सांगितले की, त्यांच्याकडे फक्त सायकल आहे, मुलाकडे तीही नाही. एवढेच नाही तर कारचा फिटनेस कालावधी 13 नोव्हेंबर 2012 असल्याचे सांगण्यात आले आहे. एआरटीओ प्रशासन अशोक कुमार यांनी सांगितले की, नोटीस चुकीने मिळाल्याची शक्यता आहे. आम्ही त्याची दखल घेतली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.