पुढारी ऑनलाईन डेस्क : 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला पंजाबमधील मोगा येथे शनिवारी ( दि. २२) केली होती. या कारवाईसाठी अकाल तख्तचे माजी प्रमुख आणि जर्नेल सिंग भिंद्रनवाले याचा पुतणा जसबीर सिंग रोडे याने महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात 'इंडिया टूडे'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अमृतपाल याने आपल्याला रोडेवाल गुरुद्वारात आत्मसमर्पण करायचे आहे, अशी इच्छा जसबीर सिंग यांच्याकडे व्यक्त केली होते. त्यानुसार जसबीर यांनी २२ एप्रिलच्या रात्री अमृतपालला गुरुद्वारात पोहोचण्यास सांगितले. अमृतपाल हा रोडेवाल गुरुद्वारात आल्यानंतर जसबीर यांनी याची माहिती पंजाब पोलिसांना गुप्तपणे दिली होती. यानंतर पोलिसांनी अमृतपाल सिंगला अटक केली. ( Amritpal Singh arrest )
याबाबत बोलताना जसबीर म्हणाला की, 'अमृतपाल सिंग शनिवारी रात्री गुरुद्वारात आला. त्याने स्वत: पोलिसांना आत्मसमर्पण करण्याच्या तयार असल्याची माहिती दिली. अमृतपालने ड्रेस बदलला, पायात चप्पल घातली. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी बोलताना अमृतपाल म्हणाला की, "मी येथील न्यायालयात दोषी असू शकतो, परंतु सर्वशक्तिमानाच्या न्यायालयात नाही."
अमृतपालचा सहाय्यक पापलप्रीत सिंग याला १० एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. या कारवाईचा मोठा धक्का अमृतपाल सिंगला बसल्याचे मानले गेले. कारण पापलप्रीत सिंग हाच अमृतपालसिंगला विविध ठिकाणी पलायन करण्याबरोबरच त्याची राहण्याची, जेवणाची आणि पैशाची व्यवस्था करत होता. तसेच तो त्याने सल्लागार म्हणूनही काम केले. त्यामुळेच त्याला अटक झाल्यानंतर अमृतपाल सिंगला सर्व मदत बंद झाली. दरम्यान, अकाल तख्तचे प्रमुख ग्यानी हरप्रीत सिंग यांनी अमृतपाल सिंगला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला होता.
अमृतपालची पत्नी किरणदीप कौर ही ब्रिटिश नागरिक आहे. २० एप्रिल रोजी ती लंडनला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. यावेळी पंजाब पोलिसांनी तिला अमृतसर विमानतळावर चौकशीसाठी थांबवले. पोलिसांनी अमृतपाल सिंग याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर पाळत ठेवली होती. पोलिसांनी पत्नीची चौकशी केल्यानंतर अमृतपालने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा :