पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी इंग्रजांना मदत केली,असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. कर्नाटकातील सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी सावरकर आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर गंभीर आरोप केले आहेत. (Bharat Jodo Yatra)
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर इंग्रजांची मदत करत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्ष लढत होता. या काळात सावरकरांना इंग्रजांकडून पैसा मिळत होता.
पीएफआय संघटनेबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, द्वेष आणि हिंसा करणे हे राष्ट्रविरोधी कार्य आहे. आम्ही अशा लोकांविरोधात लढत आहोत. तसेच आम्ही नव्या शैक्षणिक धोरणाचा विरोध करत आहोत. कारण नवे शैक्षणिक धोरण इतिहास आणि परंपरांना विकृत करत आहे. (Bharat Jodo Yatra)
राजस्थानमध्ये ६५००० कोटींची गुंतवणूक करत ४०,००० लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचा शब्द आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती गौतम अदाणी यांनी काँग्रेस नेते अशोक गहलोत यांना दिला होता. गौतम अदाणी शुक्रवारी (दि.७) इनव्हेस्ट राजस्थान २०२२ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर भाजपकडून काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप करण्यात येत होते. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Bharat Jodo Yatra)
राहुल गांधी म्हणाले, मी उद्योगतींच्या विरोधात नाही. मी दोन ते तीन व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीचा विरोध करतो. जर राजस्थान सरकार गौतम अदाणींना चुकीच्या पद्धतीने उद्योगांमध्ये संधी देत असेल तर मी त्याचाही विरोध करेल. कोणताही मुख्यमंत्री आपल्या राज्यात गुंतवणूक व्हावी, यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे अशोक गहलोत यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. (Bharat Jodo Yatra)