Latest

भंडारा : वनपरिक्षेत्रात परवानगीशिवाय कॅम्पिंग करणाऱ्या १४५ तरुण-तरुणींना माघारी धाडले

अविनाश सुतार

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी जलाशयाजवळील वनविभागाच्या संवेदनशील परिसरात अॅडव्हेंचरच्या नावाखाली नवीन वर्ष साजरे करण्यासाठी परवानगी न घेता तळ ठोकून बसलेल्या सुमारे १४५ तरुण-तरुणींना परत नागपूरला रवाना केले. भंडारा वनविभाग व जिल्हा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. या भागात वाघांचा वावर असल्याने पर्यटकांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवले जात आहे.

रावणवाडी जलाशयाच्या सभोवताली, वन विभागाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती, रावणवाडी यांच्या नियंत्रणाखाली पर्यटनास परवानगी दिली जाते. ज्यात जलाशयातील बोटी, उंटाची सवारी, मंदिर भेट यांचा समावेश आहे. गर्द जंगल परिसर, डोंगरांनी वेढलेले सुंदर तलाव यामुळे वीकेंडला किंवा विशेष प्रसंगी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. नागपूरस्थित अल्फा अॅडव्हेंचर कंपनीने रावणवाडी येथे अॅडव्हेंचर कॅम्पिंग करण्याचे आश्वासन देत ३१ डिसेंबर रोजी व्हिडिओ तयार करून इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता.

याबाबत कंपनीच्या संचालकाने सांगितले की, १४५ तरुण-तरुणींकडून साहसी शिबिराच्या नावाखाली एका रात्रीसाठी प्रति जोडप्यासाठी ६ हजार रुपये आणि स्टॅग एंट्रीसाठी २ हजार ४०० रुपये घेतले. या सर्वांनी ३ खासगी बसने रावणवाडी गाठले आणि जलाशयाच्या पश्चिमेला वनविभागाच्या जागेवर ७५ टेंट लावले होते.

या शिबिराचे फोटो आणि व्हिडिओ यापूर्वीच नागपूर शहरात व्हायरल झाले होते. याची माहिती भंडारा मानद वन्यजीव रक्षक नदीम खान यांना मिळताच त्यांनी भंडारा प्रादेशिक वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक राहुल गवई व जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना सूचित केले. लोहित मतानी यांनी तत्काळ अड्याळ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पाठवले. अड्याळ स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे, भंडारा रेंजर विवेक राजूरकर, राउंड ऑफिसर तिबुडे आणि मानद वन्यजीव वॉर्डन नदीम खान यांनी रावणवाडी येथे पोहोचताच आयोजक वैभव वर्मा यांना फोनवर वाघिणीच्या कॅमेरा ट्रॅपची छायाचित्रे दाखवली.

त्यांना तत्काळ कॅम्पिंग एरिया परिसर सोडण्यास सूचना दिली. आयोजकांना दोन तासांत खाली न केल्यास फॉरेस्ट अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्याची तंबी दिली. वनविभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आयोजकांनी सांगितले. वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ११ वाजता सर्व जणांना संवेदनशील परिसरातून हटवण्यात आले. जिल्ह्यातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.

विवेक राजूरकर, वन परिक्षेत्र अधिकारी, भंडारा यांनी सांगितले की, परवानगीशिवाय वनक्षेत्रात प्रवेश केल्यास भारतीय वन कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये प्रति व्यक्ती ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. भंडारा वनपरिक्षेत्रातील रावणवाडी हा संवेदनशील परिसर असून पर्यटन क्षेत्राबाहेरील वनक्षेत्रात जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मानद वन्यजीव रक्षक नदीम खान म्हणाले की, विनाकारण जंगलात जाणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांनी अशा घटनांमधून धडा घेण्याची गरज आहे. भंडारा वनविभागाचे उप वनसंरक्षक राहुल गवई म्हणाले की, अनियंत्रित पर्यटन जीवघेणे ठरू शकते. वनक्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी परिसराची माहिती जरूर घ्यावी. पर्यटकांना परवानगी असेल तिथे जाण्यात काही नुकसान नाही, पण साहसाच्या नावाखाली अनियंत्रित पर्यटन करणे धोकादायक आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT