पुढारी ऑनलाईन डेस्क : आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ दिसून येते. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणात फराळांमध्ये मसाल्यांचा वापर होतो. मसाल्यांमध्ये देखील सध्या मोठ्या प्रमाणात भेसळ होताना दिसून येते. ही भेसळ प्रामुख्याने मसाल्यांचे वजन आणि प्रमाण वाढवण्यासाठी केला जाते. विटांची पूड, सिमेंट, पपईच्या बिया किंवा चुना असे घटक या भेसळीसाठी वापरले जातात. त्यामुळे खोट्या आणि हानिकारक मसाल्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे. जाणून घेऊया भेसळयुक्त मसाले कसे असतात या विषयी…
काळी मिरी या मसाल्यामध्ये पपईच्या बिया मिसळल्या जातात. या भेसळीनंतर काळ्या मिरीची चवच बिघडते. पपईच्या बिया या आरोग्यासाठी अपायकारक असतात. FSSAI ने काळ्यामिरीतील भेसळ कशी ओळखावी यासंबंधित काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. एक ग्लास पाण्याने भरा आणि त्यात एक चमचा काळी मिरी घाला. खरी मिरपूड तळाशी बुडेल आणि नकली पाण्यावर तरंगत राहील. अशा प्रकारे आपण मसाल्यातील काळ्या मिरीची पारख तुम्ही करु शकता.
मिरची पावडरच्या चवीमध्ये कित्येकदा फरक झालेला आढळून येतो. रंगाने लाल भडक असणारी मिरची पावडर ही चवीला तिखट असल्याची हमी विक्रेता देत असतो; पण एखादा नवा विक्रेता नेहमी याबाबत खरी माहिती देईल की नाही याबाबत शंका आहे. ही पावडर खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी एक साधी चाचणी केली जाऊ शकते. बहुतेक लाल मिरच्यांमध्ये खडू, रासायनिक रंग किंवा वीट पावडर मिसळली जाते. खरी मिरची पावडर ओळखण्यासाठी हा पुढील प्रयोग करून पाहा. एक ग्लास पाण्यात एक चमचा लाल मिरची पावडर टाका, आता ही पावडर पाण्यात विरघळत आहे का ते पहा. जर ही मिरची पावडरमध्ये काही भेसळ असेल तर तिचा रंग बदलतो. अशा प्रकारे विक्रेत्याने दिलेली मिरची पावडर ही योग्य आहे का हे पाहू शकतो.
हळदीचा मसाल्यांमध्ये मुख्य वापर तर आहेच; पण आरोग्यविषयीदेखील याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे यामधील भेसळ ओळखणे हे खूप फायद्याचे ठरते. भेसळ आहे का, हे पुढील प्रयोगाद्वारे पाहता येईल. एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा हळद मिसळा. हळद पाण्यात विरघळल्यानंतर हळूहळू पिवळा रंग येईल आणि थोड्या वेळाने तो स्थिर होईल तर ह. याउलट जर पाण्यातील रंग जाड पिवळा असेल आणि स्थिर होत नसेल तर या हळदीमध्ये भेसळ आहे, असे समजावे
एक चमचा जिरे घेऊन हातावर चोळा. तळहातावर जिरे चोळल्यानंतर रंग निघू लागला तर समजून घ्या की जिरे बनावट आहेत. बनावट जिऱ्यात रंग आणि रसायन मिसळले जातात.
हेही वाचा