बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी शहरात सीमावासीयांचा महामेळावा होत असतानाच सुरक्षेचे कारण पुढे करत जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना शहरात प्रवेशबंदी केली आहे. महामेळाव्याला येणारे तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खा. धैर्यशील माने यांनाही प्रवेश नाकारला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव बंदीचा (Belgaum Mahamelava) आदेश काढला आहे. बेळगावात १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून या अधिवेशनाला महामेळाव्याच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात येते. सोमवारच्या महामेळाव्यासाठी मध्यवर्ती समितीने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केले होते. पण, महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात बोलावू नये, यासाठी पोलिसांकडून दबाव येत होता. या महामेळाव्याला आपण उपस्थित राहणार आहे, आवश्यक सुरक्षा पुरवा, असे अधिकृत पत्र महाराष्ट्राचे तज्ज्ञ समिती अध्यक्ष, खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पण, रविवारी दुपारी कर्नाटकचे एडीजीपी आलोक कुमार यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश देण्यात येणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर संध्याकाळी जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी प्रवेशबंदीचा आदेश बजावला आहे.
हेही वाचा