कोगनोळी : पुढारी वृत्तसेवा मराठी भाषिक जनतेला वेठीस धरणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा जोरदार घोषणा देत शिवसेनेतर्फे येथील राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन छेडून दोन तास महामार्ग रोखून धरला. शिवसैनिकांनी कर्नाटक प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध करून घोषणाबाजी केली.
1 नोव्हेंबर हा दिवस सीमाभागातील मराठी भाषिक काळा दिन म्हणून साजरा करतात. बेळगाव येथे असणाऱ्या मराठी भाषिक लोकांना पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक हद्दीतील दूधगंगा नदीवर अडवून महाराष्ट्रात परत पाठवून दिले. यावेळी पोलिस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या मांडून आंदोलन छेडले.
शिवसेनेचे विजय देवणे म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक लोक १ नोव्हेंबर काळा दिन साजरा करतात. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण जात असताना कर्नाटक प्रशासनाने अडवणूक केली आहे. मराठी भाषिक लोकांवर कर्नाटकात मोठ्याप्रमाणात अन्याय होत आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचा मराठी भाषिक लोकांना कायम पाठिंबा राहील. कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्नाटक प्रशासनाची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
सुमारे २ तास झालेल्या आंदोलनानंतर आंदोलकांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेऊन राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस खुला करून दिला. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, शिवगोंडा पाटील, विद्या गिरी, विशाल देवकुळे, विनोद खोत, विराज पाटील, वैभव आडके, सागर पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
दूधगंगा नदीला पोलिस छावणीचे स्वरूप
महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते कर्नाटकामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळताच काल (मंगळवार) पासूनच दूधगंगा नदीवर पोलिस फाटा तैनात केला आहे. निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक तळवार यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला आहे. सकाळी महाराष्ट्रातील शिवसेनेचे भगवे झेंडे घेऊन नेते दूधगंगा नदीवर येताच त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. दूधगंगा नदी परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
हेही वाचा :