अथणी (कर्नाटक) : पुढारी वृत्तसेवा
आत्महत्या केलेल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी येणार्या तरूणाचा मंगसुळीजवळ अपघातात मृत्यू झाला. उदय शिवशंकर गोठखिंडी (वय 36, रा. अथणी) असे मृताचे नाव आहे. उदय हा पुणे येथे खासगी कंपनीमध्ये कामाला होता. चुलत भावाच्या मृत्यूचे वृत्त समजताच तो कारने अंत्यसंस्कारासाठी येत होता. शनिवारी रात्री मंगसुळीजवळ कारची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे दोघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची नोंद कागवड पोलिस स्थानकात झाली आहे.
उदय याचा भाऊ अभिषेक मल्लिकार्जुन गोटखिंडी (वय 35) याने कर्जबाजारी झाल्याने विजापूर येथे आत्महत्या केली. तो ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेला होता. यातूनच कर्जबाजारी झाल्याने विजापूर येथे लॉजवर त्याने आत्महत्या केली.ऑनलाईन जुगारामुळे त्याच्यावर लाखो रूपयांचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला होता. यातूनच त्याने विजापूरला जाऊन एका लॉजवर जाऊन आत्महत्या केली. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी येताना अपघातात उदयचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.