अंकली : येडूर-कल्लोळ बंधार्यापासून कागवाडे शेतापर्यंतच्या परिसरात शॉर्टसर्किटने सुमारे 50 एकरांतील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. विद्युत मोटारींना जाणार्या विद्युत वाहिन्यांच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या घटनेत महेश कागवाडे, ईरगौड कागवाडे, सागर चव्हाण, शेखर मिरजे, प्रशांत उमराणे, निलेश खडके, अनिल चव्हाण, सुरेश कागवाडे, अशोक मिरजे, सतीश चव्हाण, रमेश मोहिते या शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
संपूर्ण ऊस पीक जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना, चिकोडी अग्निशमन दल, सदलगा अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने भेट देऊन आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. या घटनेत शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.