अंकली, पुढारी वृत्तसेवा: व्यसनाधीन पतीचा त्रास व कौटुंबिक वादातून पत्नीने आपल्या तीन मुलांसह कृष्णा नदीत उडी घेऊन जीवन संपविले. रायबाग तालुक्यातील चिंचली शहरातील ही घटना आज (दि.५) सकाळी उघडकीस आली. कुडची पोलिसांनी व्यसनाधीन पतीला ताब्यात घेतले आहे. चिंचली येथील रहिवासी शारदा ढाले (वय ३८), अनुषा ढाले (वय १०), अमृता ढाले (वय १४) व आदर्श ढाले (वय ८) अशी मृतांची नावे आहेत. (Belgaum Crime News)
याबाबत घटनास्थळी व कुडची पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, चिंचली येथील रहिवासी असलेल्या अशोक ढाले (वय ४५) हा दररोज पत्नीला मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्यामुळे सततच्या वादामुळे अशोक ढाले याची पत्नीने आपल्या मुलासह टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची कुडची पोलिसांत नोंद झाली आहे. अशोक ढाले याला अटक केली आहे. मृतदेह नदी पात्राबाहेर काढून शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. (Belgaum Crime News)