Tikota agricultural service center fire Pudhari
बेळगाव

Vijayapura Fire | तिकोटा येथील कृषी सेवा केंद्राला भीषण आग: २ कोटी ५० लाखांचे नुकसान

दुकानातील खतांची पोती, कीटकनाशक औषधांचा साठा, शेतीसंबंधित विविध साहित्य, संगणक, फर्निचर आदी सर्व साहित्य जळून खाक

पुढारी वृत्तसेवा

Tikota agricultural service center fire

विजयपूर : विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा शहरातील बसवेश्वर चौकाजवळ असलेल्या महेश मिसाळ यांच्या मालकीच्या धरिदेवर कृषी सेवा केंद्राला मंगळवारी (दि.१९) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे २.५ कोटींचे नुकसान झाले आहे.

द्राक्ष, डाळिंब तसेच इतर पिकांसाठी लागणारी कीटकनाशके आणि रासायनिक खतांनी भरलेल्या या दुकानात अचानक लागलेली आग काही क्षणांतच मोठ्या प्रमाणावर पसरली. त्यामुळे दुकानातील खतांची पोती, कीटकनाशक औषधांचा साठा, शेतीसंबंधित विविध साहित्य, संगणक, फर्निचर आदी सर्व साहित्य जळून खाक झाले.

आगीची तीव्रता इतकी होती की, दुकानातील बहुतांश साहित्य वाचवता आले नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती मालक महेश मिसाळ यांनी दिली. घटनास्थळी तिकोटा पोलीस ठाण्याचे पीएसआय देवराज उल्लागड्डी, सीपीआय आणि पोलिस कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली.

स्थानिकांचा संताप

तालुका केंद्र होऊन सहा-सात वर्षे झाली तरी तिकोटा शहरात अग्निशामक केंद्र नसल्यामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या तिकोटा शहरात आग लागल्यास विजयपूरहून अग्निशामक दल पोहोचेपर्यंत मोठे नुकसान झालेले असते. त्यामुळे शहरात स्वतंत्र अग्निशामक केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दुकानात सुमारे २.१० कोटींची औषधे आणि खतांचा साठा होता. इमारतीसह एकूण २.५ कोटींचे नुकसान झाले आहे.
— महेश मिसाळ, मालक
अलीकडे शहरासह परिसरात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अनेक वेळा अग्निशामक केंद्राची मागणी करूनही प्रशासनाने अद्याप केंद्र सुरू केलेले नाही.
— सुरेश कोन्नूर, स्थानिक नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT