Vijapur Crime pudhari photo
बेळगाव

Vijapur Crime : पतीच्या खूनप्रकरणी पत्नीसह प्रियकराला जन्मठेप

बेडरूममध्ये जाऊन पॉलिस्टरच्या दोरीने प्रकाश यांचा गळा आवळून खून केल्याचे तपासात समोर

पुढारी वृत्तसेवा

विजापूर : शहरातील एकतानगर येथील रहिवासी प्रकाश लक्ष्मण हळ्ळी यांना जेवणातून झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळून खून केल्याच्या प्रकरणात विजापूर येथील दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मृताची पत्नी राजेश्वरी हळ्ळी आणि प्रियकर आरोपी रवी तळवार या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या प्रकरणातील आरोपी राजेश्वरी गंगाधर हळ्ळी (रा. एकतानगर, विजापूर), रवी कांतप्पा तळवार आणि गुरप्पा बसलिंगप्पा माळी (दोघेही रा. हिरेरुगी) यांनी संगनमत करून प्रकाश हळ्ळी यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले होते. आरोपी राजेश्वरी हिने पती प्रकाश यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. ते झोपल्यानंतर तिने फोन आणि एसएमएसद्वारे आरोपी रवी व त्याच्या मित्राला घरी बोलावून घेतले. त्यानंतर तिघांनी बेडरूममध्ये जाऊन पॉलिस्टरच्या दोरीने प्रकाश यांचा गळा आवळून खून केल्याचे तपासात समोर आले.

मृताचे वडील लक्ष्मण अमिनप्पा हळ्ळी (रा. सानेगिनाळ) यांनी जलनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक एम. वाय. तळवार यांनी जलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा पुढील तपास गोलघुमट पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रमेशचंद्र आवजी यांनी केला. त्यानंतर तत्कालिन डीवायएसपी सिद्धेश्वर यांनी तपासाची जबाबदारी स्वीकारून तपास पूर्ण केला. त्यानंतर विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय (विशेष न्यायालय) येथे न्यायाधिश अब्दुलरहिमान ए. नंदगडी यांच्या समोर सुनावणी झाली. सुनावणीवेळी न्यायालयाने आरोपी राजेश्वरी हिला जन्मठेप आणि तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रवी तळवार यालाही जन्मठेप आणि ४ लाख ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

तिसरा आरोपी गुरप्पा माळी याचा मृत्यू झाला आहे. मृत प्रकाश यांच्या तीन मुलांना एकूण ७ लाख हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शासनातर्फे विशेष सरकारी वकील हुसेसाब मुल्ला ५० यांनी बाजू मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT