विजापूर : शहरात अलीकडे दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या प्रकरणांचा तपास करून आरोपींना अटक करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखलक्ष्मण निंबरगी आणि अतिरिक्त पोलिस प्रमुख रामनगौडा हत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून 17 दुचाकी जप्त केल्या आहेत.
तपास पथकाने इंडी रोडवरील ज्योती फॅक्टरीजवळ वीरभद्र शिवशरण कुंबार (वय 31, रा. गणिहार, ता. सिंदगी) व श्रीशैल शंक्रेप्पा बिरादार (वय 31, रा. गणिहार, ता. सिंदगी) यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांनी विजापूर शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून विविध कंपनीच्या 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत 11,00,000 रूपये आहे.
या पथकाचे नेतृत्व पोलिस उपअधीक्षक बसवराज यलिगार, सर्कल इन्स्पेक्टर मल्लय्या मठपती (गोलगुंबज विभाग), पीएसआय बसवराज ए. तिप्परड्डी (एपीएमसी पोलिस ठाणे) यांनी केले. उपनिरीक्षक (महिला व बाल विभाग) श्रीमती एन. बी. उप्पलदिन्नी आणि आसिफ गूडगुंटी, एस. बी. तेलगांव, लक्ष्मण एम. बिरादार, रमेश जाधव, संतोष मेलसकरी, आनंद हिरेकुरबर, एस. आर. पुजारी, सुरेश कुंबार यांचा तपास पथकात सहभाग होता.