

बेळगाव : बाप्पा मोरयाचा गजर, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशा आणि बंदी असूनही डीजेचा गजर तसेच पुढच्या वर्षी लवकर या... अशी साद घालत जल्लोषी पण तितक्याच भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. यंदा श्रींची विसर्जन मिरवणूक तब्बल 32 तास चालली. शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता पहिल्या श्रीमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर रविवारी रात्री दहा वाजता महापालिकेच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. अकरा दिवस आनंद, उत्साह आणि चैतन्याने बहरलेल्या गणेशोत्सवाची बाप्पांना निरोप देत सांगता झाली.
हुतात्मा चौक येथे संयुक्त महाराष्ट्र चौक मंडळाच्या मानाच्या श्रीमूर्तीची पूजा व आरती करून शनिवारी सायंकाळी चार वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणूक मार्ग सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते व गणेशभक्तांच्या वर्दळीने गजबजला होता. रात्री नऊनंतर मिरवणूक मार्गावर गर्दी वाढली.
पहिला गणपती संयुक्त महाराष्ट्र चौकाचा
शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रीमूर्तीचे कपिलेश्वर तलावात सर्वप्रथम विसर्जन करण्यात आले. त्यानंतर विसर्जनस्थळी यंत्रणा सज्ज असूनही श्रीमूर्तींची प्रतीक्षा करावी लागली. सायंकाळी विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर सार्वजनिक मंडळांच्या एकेक श्रीमूर्ती दाखल होऊ लागल्या.
मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर आणि डीजेचीही साथ असल्याने तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होेते. शनिवारी रात्री विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी झाली होती. शहराबाहेर विविध ठिकाणी बॅरिकेडस् लावून वाहनांना मिरवणूक मार्गाकडे येण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे वाहने दूरवर थांबवून चालत येत श्रीमूर्ती पाहण्याचा आनंद घेतला जात होता. मिरवणूक मार्गावर शहरासह परगावच्या गणेशभक्तांची मोठी गर्दी होती.
मध्यरात्री पोलिस आयुक्त तलावावर
शनिवारी सायंकाळी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी विसर्जन तलावाची पाहणी करून गर्दी व गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या.रात्री एक वाजता विसर्जन तलावावर गर्दी झाल्यानंतर बोरसे यांनी स्वत: तीन तास थांबून नियोजन केले. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकार्यांनी विसर्जन व्यवस्थेवर लक्ष ठेवले होते. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता. जलद कृती दलाचे जवानही लक्ष वेधून घेत होते.
गणेशभक्तांचा उत्साह आणि संथगतीने सुरू असलेले श्रींचे विसर्जन यामुळे सार्वजनिक श्रीमूर्तींना रांगेत थांबावे लागले. रविवारी सकाळी सातपर्यंत कपिलेश्वर आणि कपिलतीर्थ तलावावर 110 श्रीमूर्तींचे विसर्जन झाले होते. दोन्ही तलावावर नऊ क्रेन सेवेत होत्या. विसर्जन सुरू असताना दुर्घटना घडू नये, यासाठी लाईफ जॅकेट व जलतरणपटू तैनात होते. रविवारी रात्री आठ वाजता पंधरा गणेशमूर्ती विसर्जन होणे बाकी होते. यानंतर रात्री दहा वाजता महापालिकेच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर विसर्जनाची सांगता झाली.
विसर्जनाला उच्चांकी वेळ
यंदा विसर्जन मिरवणूक उच्चांकी वेळ म्हणजे तब्बल 32 तास चालली. कपिलेश्वर जुन्या व नव्या तलावावर नऊ क्रेनची सोय करण्यात आली होती. श्रीमूर्ती विसर्जनस्थळी आल्यानंतर आरती करून क्रेन लावण्यात वेळ जात होता. प्रशासन व महामंडळाने दक्षता घेऊनही विसर्जन प्रक्रिया संथगतीने सुरू राहिली.