बेळगाव: उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्याची मागणी होत असताना आता स्वतंत्र तुळुनाडूच्या लढ्याने उचल खाल्ली आहे. शुक्रवारी (दि. 21) उडुपीत स्वतंत्र तुळुनाडूचे ध्वज फडकवण्यात आले. उडुपी, मंगळूर, कासरगोड आदी भागांत तुळू भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. स्वतंत्र तुळुनाडू राज्याची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी ते सातत्याने करत आहेत.
1 नोव्हेंबर रोजी बेळगाव सीमाभागात काळादिन पाळण्यात येतो. तशाच प्रकारे उडुपी येथे स्वतंत्र तुळुनाडूची मागणी करत ध्वज याआधीही फडकावण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी होत आहे. कागवाडचे आमदार राजू कागे यांनी बेळगावात डिसेंबर महिन्यात होणार्या विधिमंडळ अधिवेशनात स्वतंत्र उत्तर कर्नाटकाचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे जाहीर केले आहे.
आता स्वतंत्र तुळुनाडूच्या मागणीनेही उचल खाल्ली आहे. उडुपी, मंगळूर भागात खासगी बस वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. या बसेसच्या शेडवर आज स्वतंत्र तुळुनाडूचा ध्वज फडकावण्यात आला.