बेळगाव : आपल्या विविध मागण्यांसाठी परिवहन महामंडळाचे कर्मचारी मंगळवारपासून (दि. 5) बेमुदत आंदोलन करणार आहेत. मात्र, कर्मचार्यांनी आंदोलन केल्यास शासनाने ‘अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा’ (एस्मा) लागू करत कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी (दि. 4) मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरणार आहे. तरीसुद्धा कर्मचार्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे. आंदोलन झाल्यास सार्वजनिक बसव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज्यातील विविध परिवहन महामंडळांतील कर्मचारी संघटनांनी मंगळवारपासून आंदोलनाचा इशारा दिला असला तरी शासनाने आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधीच ‘एस्मा’ लागू केला आहे. शासनाने मागील अनेक वर्षांपासून परिवहन कर्मचार्यांच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. वेतन, शासकीय कर्मचारी म्हणून नोंदणी, नोकरभरती या प्रमुख मागण्यासह इतर मागण्या केल्या आहेत. मात्र, अद्याप या मागण्यांकडे सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने परिवहन संघटना आक्रमक झाल्या आहेत.
यापूर्वी वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी परिवहन कर्मचार्यांनी दोनवेळा आंदोलन छेडले होते. त्यामुळे, सार्वजनिक बस वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. या काळात खाजगी वाहनांवर प्रवाशांना अवलंबून राहावे लागले होते. दरम्यान काही कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर संप होणार की नाही, याचा निर्णय होणार आहे.