बेळगाव

House roof collapse Belagavi | घराचे छप्पर कोसळून मोठी दुर्घटना; दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

विजापूर जिल्ह्यातील आलमेल तालुक्यातील मोरटगीत भीषण दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

दिपक शिंत्रे

विजापूर : जिल्ह्यातील आलमेल तालुक्यातील मोरटगी येथे शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण दुर्घटनेत घराचे छप्पर कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये गुरुनाथ बडिगेर (वय ३५), त्यांची पत्नी ज्योती बडिगेर (वय २८), मुलगी काळम्मा बडिगेर (वय १३) आणि धाकटी मुलगी कीर्ती बडिगेर (वय ९) यांचा समावेश आहे. घराचे छप्पर अचानक कोसळल्याने हे चौघेही ढिगाऱ्याखाली अडकले. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले, मात्र त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

या दुर्घटनेत गुरुनाथ बडिगेर यांची आई शांताबाई आणि मुलगा वीरेश (१०) हे दुसऱ्या घरात झोपले असल्याने थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस, आरोग्य आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सिंदगी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आनंद के., एसपी लक्ष्मण निंबरगी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद यांनी त्यांना घटनेची माहिती दिली.

मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करताना मंत्री एम. बी. पाटील यांनी सरकारतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली. अशा प्रकारे एकूण २० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच बचावलेल्या वीरेश बडिगेर यांच्या शिक्षणाची जबाबदारीही शासनाकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री एम बी. पाटील म्हणाले की, “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. गुरुनाथ बडिगेर यांचे स्वतःचे घर दुरुस्तीत असल्याने ते भाड्याच्या घरात राहत होते. आज ते स्वतःच्या घरी परतणार होते; मात्र नियतीने घाला घातला.” या वेळी सिंदगीचे आमदार अशोक मनगूळी, माजी आमदार रमेश भूसनूर, नरसिंगसा तिवारी, अशोक वारद तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT