बेळगाव : बेळगावहून सौंदत्तीला हायस्कूलला जाणार्या शिक्षकाला बसमध्येच हृदयविकाराचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. अमृत रामचंद्र पाटील (वय 50, रा. सोनोली, ता. बेळगाव) असे त्यांचे नाव आहे. ते सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी सरकारी हायस्कूलमध्ये सेवा बजावत होते.
गुरुवारी (दि.27) सकाळी ते नेहमीप्रमाणे सोनोलीहून बेळगावपर्यंत दुचाकीवरून आले. मध्यवर्ती बस स्थानकावरून त्यांनी दुचाकी लावून सौंदत्तीला जाणारी बस पकडली. पण, काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि बसमध्येच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. बसमधील कर्मचार्यांनी गांभीर्य ओळखून त्यांना दुसर्या वाहनातून तातडीने सकाळी साडेअकराच्या सुमारास खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, मुलगी, बहिण असा परिवार आहे. त्यांची पत्नीही शिक्षिका असून, त्या खानापूर तालुक्यात सेवा बजावतात. अमृत हे शांत आणि मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांनी शिक्षकी सेवेला सुरवात जोयडा-रामनगरमधून केली होती. 10 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी हुलीकट्टी हायस्कूलमध्ये बदली झाली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास सोनोली गावात अंत्यविधी पार पडले.