Belagavi Lokeshwara Swami Arrested In Rape Case
चिकोडी : काशिनाथ सुळकुडे
एका स्वामीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना रायबाग तालुक्यातील मेखळी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोकेश्वर नावाच्या नराधम स्वामीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
घरी सोडतो म्हणून गाडीत घेतले अन्...
रायबाग तालुक्यातील मेखळी येथील राम मंदिर मठाचे लोकेश्वर स्वामी याने मुडलगी तालुक्यातील मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर स्वामी पीडित मुलीच्या कुटुंबियाच्या ओळखीचा होता. त्यामुळे रस्त्याने घराकडे जाणाऱ्या पीडित मुलीला आपल्या कारमधून घरापर्यंत सोडतो असे सांगून घेऊन गेला. त्यानंतर बागलकोट मार्गे रायचूर पर्यंत नेऊन एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर महालिंगपूर बस स्थानकात तिला सोडले आणि घरच्यांना याबाबत सांगितल्यास तुला मारून टाकू, अशी धमकी दिली.
स्वामीला अटक; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
पीडित मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी बागलकोट महिला पोलिस स्थानकात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून, बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी पोलिस ठाण्याला प्रकरण हस्तांतरित करण्यात आले आहे. याप्रकरणी मुडलगी पोलिसांनी स्वामीला अटक केली आहे.
मठावर धाड; तलवारी, चाकू, कोयत्यासह सापडला शस्त्रांचा साठा
यानंतर पोलिसांनी मठावर धाड टाकल्यावर मठामध्ये तलवारी, चाकू, कोयता यासह अन्य शस्त्रे मिळाली आहेत. दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये मटका नंबर सांगण्याचे काम स्वामी करत होता. पैशाच्या अमिषाने दुसऱ्या जिल्ह्यातील भक्त लोक मोठ्या प्रमाणात येत असत. नराधम स्वामीमुळे गावचे नाव खराब होत असल्याचा आक्रोश ग्रामस्थांनी व पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. उत्तर कर्नाटकात अशा प्रकारचे अनेक भोंदू स्वामींचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे अशा भोंदू स्वामींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.