काशिनाथ सुळकुडे
कर्नाटक : साखरेचा तुटवडा रोखण्यासाठी आणि साठेबाजीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारच्या सूचनेनुसार, १ ऑगस्ट २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साखरेच्या साठवणुकीवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. बेळगावी जिल्हा प्रशासनाकडून सर्व साखर व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांना या नियमांचे कडक पालन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या उपसंचालकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, कोणताही साखर व्यापारी किंवा संस्था साखरेचा साठा प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांपेक्षा जास्त काळ स्वतःकडे ठेवू शकणार नाही. तसेच, कोणत्याही वेळी ४,००० क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्व व्यापाऱ्यांना या मर्यादेचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे.
ही कारवाई अधिक पारदर्शक करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व साखर व्यापारी, सगट (घाऊक) विक्रेते आणि साठवणूक केंद्रांना त्यांच्या साठ्याची माहिती सरकारच्या अधिकृत पोर्टलवर अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या साखरेच्या साठ्याची संपूर्ण माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या foodstock.dfpd.gov.in या अधिकृत पोर्टलवर नोंदवून ती नियमितपणे अपडेट करावी लागणार आहे.