बेळगाव : टिळकवाडी येथे बंद घर फोडून तब्बल 30 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले आहेत. 215 ग्रॅम सोन्याचे दागिने, 900 ग्रॅम चांदी व 15 हजारांची रोकड असा 30 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची नोंद टिळकवाडी पोलिसांत झाली आहे. घरमालक विवेक बिरेंद्रप्रसाद पांडे (वय 35, रा. गुरुमाऊली अपार्टमेंट, मराठा कॉलनी, टिळकवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विवेक पांडे यांच्या भाच्याचे लग्न असल्याने घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह मुरगोड (ता. सौंदत्ती) येथे गेले होते. 5 डिसेंबर रोजी गेलेले पांडे कुटुंबीय शुक्रवारी 12 रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास घरी पोहोचले. यावेळी त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडल्याचे आढळून आले. लॉकर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.
येथील बेडरूममधील रॅकमध्ये एका पर्समध्ये चाव्यांचा गुच्छा ठेवला होता. तो घेऊन कपाट उघडून चोरट्यांनी आतील 21 लाख 50 हजार रुपये किमतीचे 215 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, 9 लाख रुपये किमतीच्या 900 ग्रॅम चांदीच्या वस्तू व 15 हजार रुपयांची रोकड पळवून नेली. याप्रकरणी त्यांनी शुक्रवारी सायंकाळी टिळकवाडी पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी तपास करीत आहेत.