Sidnal family dispute in Belgaum
बेळगाव : उतारा टाकून जाताना सीसीटीव्हीत कैद झालेला अज्ञात. Pudhari File Photo
बेळगाव

बेळगाव : मालमत्तेसाठी काळी जादू?

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : आपल्या पतीच्या व वडिलांच्या नावे असलेली मालमत्ता हडप करण्यासाठी आपले दीर, जाऊ व त्यांच्या मुलाने आपल्या कुटुंबावर काळी जादू केली आहे, अशी तक्रार दीपा शिवकांत सिदनाळ यांनी कॅम्प पोलिसांत दिली आहे.

दीपा सिदनाळ या प्रसिद्ध उद्योजक विजय संकेश्वर यांंच्या कन्या तर दिवंगत उद्योजक शिवकांत सिदनाळ यांच्या पत्नी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कॅम्प पोलिसांत त्यांचे दीर शशिकांत एस. सिदनाळ, त्यांची पत्नी वाणी व मुलगा दिग्विजय शशिकांत सिदनाळ या तिघांसह एका अनोळखी व्यक्तीविरोधात 29 जून रोजी एफआयआर नोंद झाला आहे. चौघांविरोधात भादंवि कलम 120 बी, 506, 37 तसेच काळी जादू प्रतिबंधक कायदा 2017 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

विजयकांत डेअरीवर डोळा?

दीपा सिदनाळ (रा. चॅपेल रोड, कॅम्प) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, विजयकांत डेअरी ही संस्था आपले पती स्व. शिवकांत सिदनाळ व वडील विजय संकेश्वर यांच्या नावे आहे. परंतु, ही मालमत्ता आपल्याकडून काढून घेण्यासाठी तसेच माझ्या जीवाला अपाय होईल, असे कृत्य उपरोक्त तिघेजण करत आहेत. त्यासाठी सातत्याने उतारा टाकणे, मंत्रतंत्र करणे याद्वारे काळ्या जादूचा प्रकार करत आले आहेत. 15 नोव्हेंबर 2019 ते 6 जून 2024 पर्यंत त्यांच्याकडून असे प्रकार घडलेले आहेत. अनेकदा आमच्या घराच्या बाजूला अनोळखी व्यक्ती येते, मंत्रून टाकलेल्या वस्तू ठेवते व निघून जाते. त्यामुळे ती अनोळखी व्यक्तीदेखील या प्रकारात सामील असल्याचा आरोप दीपा यांनी फिर्यादीत केला आहे. उद्योजक शिवकांत सिदनाळ यांचे 6 एप्रिल 2024 रोजी निधन झाले. त्यांच्याही जीवाला अपाय होईल, अशा पद्धतीने मंत्रतंत्र व काळी जादू केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यांच्या मृत्यूनंतर समाधीजवळदेखील मंत्रतंत्र करुन उतारे ठेवल्याचा आरोपही केला आहे. कॅम्प पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, निरीक्षक अल्ताफ मुल्ला तपास करीत आहेत.

कौटुंबिक पार्श्वभूमी

स्व. एस. बी. सिदनाळ खासदार होते. त्यांना शशिकांत व शिवकांत अशी दोन मुले. धाकटा मुलगा शिवकांत यांचा विवाह 2002 मध्ये उद्योजक विजय संकेश्वर यांची द्वितीय कन्या दीपा यांच्याशी झाला. विवाहानंतर दोघा भावांमध्ये वितुष्ट येऊन शिवकांत बाहेर पडले. त्यांनी 2006 मध्ये बैलहोंगल तालुक्यातील नेगीनहाळ येथे विजयकांत नावाने दूध डेअरी सुरू केली. डेअरची चेअरमन विजय संकेश्वर आहेत. या डेअरीचा पसारा इतका वाढला की दररोज 1 लाख 20 हजार लिटर दूध संकलन होऊ लागले. त्यानंतर त्यांनी आदित्य नावाचा ब्रँड विकसित करत दुग्धजन्य उपपदार्थाची विक्री सुरू केली. त्यानंतर हा ब्रँड मोठा बनला.

आमच्या याच डेअरीवर जाऊ व दिराचा डोळा असून ती हिसकावून घेण्यासाठी काळी जादू व मंत्रतंत्राचा वापर सुरू असल्याचा आरोप करत दीपा यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

SCROLL FOR NEXT