जमखंडी : ऊसवाहू ट्रॅक्टर-ट्रॉलीला कारने मागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार तरुण ठार झाले. सदर दुर्घटना जमखंडी तालुक्यातील सिद्धापूरजवळ बुधवारी मध्यरात्री घडली. प्रवीण शेडबाळ (वय 22), प्रज्वल शेडबाळ (17), विश्वनाथ कुंभार (17), गणेश आरळीमट्टी (20, सर्व रा. सिद्धापूर) अशी मृतांची नावे आहेत.
मुधोळ तालुक्यातील शिरोळ येथे काडसिद्धेश्वर यात्रोत्सवाला जमखंडी तालुक्यातील सिद्धापूर येथील चार तरुण कारने निघाले असताना हा भीषण अपघात घडला. ऊसवाहू ट्रॅक्टर-ट्रॉलीला कारची धडक बसल्याने चौघांचाही मृत्यू झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून, पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने कारमध्ये अडकलेेले मृतदेह बाहेर काढले.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बागलकोट एसपी सिद्धार्थ गोयल यांनी भेट दिली. अपघाताची नोंद जमखंडी ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. जमखंडीतील सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची माहिती समजताच माजी आमदार आनंद न्यामगौड यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरूवात झाली की रस्त्यांवर ऊसवाहू वाहनांची वर्दळ वाढते. या काळात अपघाताच्या घटनांतही वाढ होते. अनेक अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ऊस वाहतूक करताना नियमांचे पालन केले जात नसल्याने अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
यात्रोत्सवाला जाणार्या चार युवकांवर काळाने घाला घातल्याने सिद्धापूर गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती कळताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.