Fire News  Pudhari
बेळगाव

Nipani Shop Fire | निपाणीत शॉर्टसर्किटमुळे तीन दुकानांना भीषण आग; १० लाखांचे नुकसान

दोन डी-फ्रीज, २० मिक्सर व साहित्य जळून खाक; बस स्थानकासमोरील घटना

पुढारी वृत्तसेवा

Property loss short circuit Nipani

निपाणी : निपाणी येथील बस स्थानकासमोरील जासूद कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एकमेकाला लागून असलेल्या चहा, ज्यूस सेंटर आणि सलून अशा तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले. या आगीत दोन डी-फ्रीज, सुमारे २० मिक्सर, फळे, रोख रक्कम व अन्य साहित्य जळून खाक झाले असून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची नोंद निपाणी अग्निशमन दल तसेच बसवेश्वर चौक पोलिसांत करण्यात आली आहे.

बस स्थानकाबाहेर चिकोडी रोडलगत असलेल्या जासूद कॉम्प्लेक्समध्ये विनायक कांबळे यांचे शाहू अमृततुल्य चहा दुकान, तौफिक पकाली यांचे न्यू आईस्क्रीम व ज्यूस सेंटर आणि राजा लालवानी यांचे न्यू लुक्स सलून अशी तीन दुकाने एकमेकाला लागून आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा पकाली यांच्या ज्यूस सेंटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन दोन डी-फ्रीजला आग लागली. काही क्षणांतच आग भडकली. याचदरम्यान दुकानात ठेवलेल्या एका रिकाम्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आग शेजारील चहा दुकान आणि सलूनपर्यंत पसरली.

या आगीत ज्यूस सेंटरमधील दोन महागडे डी-फ्रीज, २० हात मिक्सर, फळे, रोख रक्कम तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. याशिवाय चहा दुकान व सलूनमधील काउंटर, फर्निचर आणि इतर साहित्यही आगीत नष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी अग्निशमन दलाला कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे निरीक्षक एस. एम. नांगनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी उदय पट्टण, जगदीश कांबळे, बी. एल. कोरे, सचिन कट्टी, जगदीश कमते व महेश कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे बाजूच्या इतर दुकानांचे मोठे नुकसान टळले.

दरम्यान, घटनास्थळी डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार आणि उपनिरीक्षक रमेश पवार यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच घटनेमुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. शनिवारी तहसील आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. संबंधित व्यावसायिकांनी या घटनेबाबत अग्निशमन दल आणि बसवेश्वर चौक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

हेस्कॉमच्या दुर्लक्षाचा आरोप

निपाणी शहर व ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर (टीसी) दुरुस्त न झाल्याने बंद असलेल्या ट्रान्सफॉर्मरवरील वीजभार इतर ट्रान्सफॉर्मरवर टाकला जात आहे. त्यामुळे स्पार्क होऊन अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप परिसरातील व्यापाऱ्यांनी केला. चिकोडी रोडलगत असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर अशोकनगर येथील बंद ट्रान्सफॉर्मरचा अतिरिक्त लोड आल्याने ही आग लागल्याचा दावा व्यावसायिकांनी केला आहे.

नेत्यांची घटनास्थळी भेट

शनिवारी आमदार शशिकला जोल्ले, युवा नेते सहकारत्न उत्तम पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम तसेच आजी-माजी नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. त्यांनी तहसील व महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामा करून बाधित व्यावसायिकांना योग्य ती भरपाई देण्याची मागणी केली. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT