

निपाणी : अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सौरभ सातापा चौगुले (वय २६, रा.म्हाकवे ता.कागल) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१२) रात्री ११ च्या सुमारास पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी येथील नदी पुलानजीक घडली. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मृत सौरभ हा कुर्ली फाटा सौंदलगा येथील नाथ बिगेस्ट फॅमिली शॉपिंग मॉलमध्ये सुपरवायझर पदावर कार्यरत होता.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सौरभ चौगुले हा गेल्या दहा वर्षापासून कुर्ली येथील नाथ बिगेस्ट फॅमिली शॉपिंग मॉलमध्ये काम करत होता. गुरुवारी रात्री कामावरून सुट्टी झाल्यानंतर काही कामानिमित्त तो दुचाकीवरून निपाणीला आला होता. दरम्यान आपले काम आटोपून तो परत आपल्या मूळगावी म्हाकवे येथे निघाला होता. दरम्यान त्याची दुचाकी यमगर्णी नदी पुलानजीक आली असता मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी याची माहिती पोलिसांना देत घटनास्थळी धाव घेतली. त्यानुसार घटनास्थळी सीपीआय बी.एस.तळवार, उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार प्रशांत कुदरी यांनी भेट देऊन गंभीर जखमी सौरभला ॲम्बुलन्समधून उपचारासाठी तातडीने कोल्हापुर येथील सीपीआर रुग्णालय दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
मृत सौरभ याच्यावर शुक्रवारी सकाळी मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सौरभ चौगुले यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, आई,वडील,आजी विवाहित बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी चुलते दादु चौगुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बसवेश्वर चौक पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या अपघात घटनेचा तपास सुरू आहे. गेल्या दहा वर्षापासून हळव्या स्वभावाचा सौरभ चौगुले नाथ परिवाराशी जोडला गेल्याने नाथ परिवाराने याबाबत हळहळ व्यक्त केली. दरम्यान शुक्रवारी सकाळी सौरभ चौगुले याला नाथ परिवाराच्यावतीने मॉलमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.