बंगळूर : बंगळूर मेट्रो रेल्वेच्या एका स्थानकाला सेंट मेरी यांचे नाव देण्याचा विचार करू, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी म्हटले आहे. तथापि, शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नाव बदलून ते सेंट मेरी स्थानक असे केले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
दरम्यान, बंगळूरमध्ये शिवाजी नगर बसस्थानक आहे. त्याच्या बाजूला मेट्रो रेल्वेचेे काम सध्या सुरू असून, स्थानक अजून बनलेले नाही. त्यामुळे अर्धवट माहितीवर भाजप नेहमी प्रक्षोभक वातावरण निर्माण करते, अशी टीका उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली आहे.
बंगळूरमधील शिवाजीनगर येथे सोमवारी सेंट मेरी बॅसिलिका येथे झालेल्या वार्षिक उत्सवात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या भाषणात मेट्रो रेल्वेच्या एका स्टेशनला सेंट मेरी नाव देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करू, असे सांगितले. त्याआधी आर्च बिशप पीटर मचाडो यांनी तशी मागणी केली होती.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर लगेच भाजपने यावर जोरदार आवाज उठवत संताप व्यक्त केला आहे. सरकार हिंदूविरोधी असल्याची टीका होत आहे; मात्र उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले की, यासंदर्भात आम्ही नुकतीच सविस्तर चर्चा केली.