जत : कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दरोडेखोरांनी लुटलेला मुद्देमाल हुलजंती (ता. मंगळवेढा) येथील एका बंद घराच्या छतावर टाकलेल्या अवस्थेत आढळून आला.
चडचण येथील बँक लुटल्यानंतर दरोडेखोरांनी लुटलेला मुद्देमाल घेऊन पळ काढला. मात्र, मंगळवेढा व कर्नाटक पोलिसांची गेल्या दोन दिवसापासून परिसरातील गस्त वाढल्यामुळे दरोडेखोरांना पुढे जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी लुटलेल्या ऐवजाची बॅग हुलजंती येथील एका बंद घराच्या छतावर टाकली. गुरुवारी (ता. 18) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास, पोलिसांच्या तपासात ही बॅग आढळून आली.
मंगळवेढा पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून ही बॅग चडचण पोलिसांच्या ताब्यात दिली. बॅगेत नेमके किती सोने आणि रोकड आहे, याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, या बॅगेत काही महत्त्वाची कागदपत्रे असल्याची चर्चा असून, त्यातून दरोडेखोरांचा तपास लागण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर चडचण पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या बँक दरोड्याचा तपास करण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांची मिळून एकूण 12 पथके तैनात केली आहेत. यात मंगळवेढा येथील पोलिस उपविभागीय अधिकारी शिवपूजे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, उपनिरीक्षक विजय पिसे, नागेश बनकर, हवालदार प्रमोद मोरे, पवार, जाधव यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.