संकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
महालक्ष्मी यात्रा समिती पदाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत हिशेबाच्या वादातून गोंधळ निर्माण झाल्याने बैठकीत वादंग माजला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वादावर पडदा पडला. सदर घटना शनिवार, दि. १८ रोजी रात्री झालेल्या बैठकीत घडली. अध्यक्षस्थानी महालक्ष्मी यात्रा समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब शिरकोळी होते.
प्रारंभी हिशेब अहवालाचे वाचन संजय हरगापूरे यांनी केले. यात्रा समितीचे सचिव बसनगौडा पाटील यांनी प्रास्ताविक करून भक्तांकडून यात्रेसंदर्भात मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त करत असतानाच लक्ष्मी ओढ्यालगत नव्याने बांधण्यात आलेल्या व्यासपीठाला कै. डॉ. सचिन पाटील किंवा अन्य कुणाचे नाव द्यावे, असा प्रश्न विचारला असता, माजी नगरसेवक राजू बाबरे यांनी व्यासपीठ उभारण्यास दिवंगत माजी मंत्री उमेश कत्ती यांनी निधी दिल्याने त्यांचे नाव व्यासपीठाला देण्यात यावे, अशी सूचना मांडली. २०१६ च्या यात्रा काळात ऑर्केस्ट्रासाठी डॉ. शरद देसाई यांनी १ लाख रुपये निधी दिला होता. मात्र, त्यांच्या नावाचा उल्लेख नाही, असा सवाल बंडू सूर्यवंशी यांनी केला.
दरम्यान, यात्रेच्या हिशेब पाहताना सावळागोंधळ असल्याचा आरोप कार्याध्यक्ष सुनील पर्वतराव यांनी केला. यावर उपाध्यक्ष अमर नलवडे यांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ निर्माण होऊ लागला. यात्रा समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब शिरकोळी यांनी मांडलेला हिशेब योग्य असून यामध्ये काही तफावत नसल्याचे त्यांनी देवीचा अंगारा स्मरून सांगितले.
मात्र, बैठकीत गोंधळ सुरू झाल्याने प्रकरण हातघाईला आल्याने सीपीआय गणपती कोग्नोळी व पोलिसांनी दोन्ही गटाला शांततेचे आवाहन करत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालविला. या हिशेबाचा तपशील संजय शिरकोळी यांनी मांडला. त्यावर विरोधी गटाच्या काही मंडळींनी त्यात तफावत असल्याची बाब निदर्शनास आणली. शिवाय यात्रा काळातील काही पावत्या नसल्याचा आरोप केला. यावर शिरकोळी गटाच्या समर्थकांनी बिनबुडाचे आरोप करू नका, असे सांगितले.
यात्रेचे हक्कदार गिरीश कुलकर्णी म्हणाले, मंगळवार दि. २१ रोजी सकाळी ८ वा. महालक्ष्मी यात्रेनिमित्त रेडा सोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला असून यासाठी सर्व समाजबांधवांनी लक्ष्मी मंदिराजवळ उपस्थित राहावे. त्यानंतर रेडा सोडण्याचा मान असणाऱ्या हवालदार यांच्या घरास जाऊन पुढील विधि करण्याचा कार्यक्रम होणार आहे.
शिरकोळी गटातर्फे अमर नलवडे, संजय शिरकोळी, बसनगौडा पाटील, श्रीकांत हतनूरी तर सुनील पर्वतराव गटातर्फे गजानन कच्चोळी, नंदकुमार मुडशी, रोहन नेसरी, विजय जरली, बंडू सूर्यवंशी, सागर जाकाती आदींनी भूमिका मांडली. दरम्यान, खातेदार कुणाल पाटील यांनी गटबाजी आणि राजकारण बाजूला ठेवून हक्कदार व ग्रामस्थांना घेऊन शांततेत यात्रा करण्याचा मनोदय व्यक्त केला.
"शहरातील १८ पगड जातीची सबकमिटी करावी. यात्रा समितीच्या अध्यक्षांनी हिशेबासंदर्भात लक्ष्मी देवीचा अंगारा घेऊन शपथ घेतल्याने हा विषय आता संपला असून यात्रेसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यास ठाम आहे. याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये."— सुनील पर्वतराव, कार्याध्यक्ष
"लवकरच सर्व समाजबांधवांची कमिटी केली जाईल. यासाठी १० ऑगस्टपर्यंत सर्व समाजबांधवांनी आपापल्या समाजाची बैठक घेऊन त्यातून एक व्यक्तीचे नाव यात्रा कमिटीच्या सबकमिटीमध्ये समावेश करण्यासाठी निवडावे. आमच्यात मतभेद नसून सर्वांना विश्वासात घेऊनच यात्रेचा कार्यक्रम केला जाणार आहे. याबद्दल दुमत नाही." ं"लवकरच सर्व समाजबांधवांची कमिटी केली जाईल. यासाठी १० ऑगस्टपर्यंत सर्व समाजबांधवांनी आपापल्या समाजाची बैठक घेऊन त्यातून एक व्यक्तीचे नाव यात्रा कमिटीच्या सबकमिटीमध्ये समावेश करण्यासाठी निवडावे. आमच्यात मतभेद नसून सर्वांना विश्वासात घेऊनच यात्रेचा कार्यक्रम केला जाणार आहे. याबद्दल दुमत नाही." — अमर नलवडे, उपाध्यक्ष