चिकोडी : तालुक्यातील हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेत पुन्हा एकदा विषबाधेची घटना घडली असून 39 विद्यार्थी अत्यवस्थ झाले. गेल्या महिन्यातच सुमारे 120 विद्यार्थी अस्वस्थ झाले होते. त्यानंतर पुन्हा अशी घटना घडल्याने खळबळ माजली असून शाळा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
हिरकोडी मोरारजी देसाई निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यरात्री अचानक उलटी व जुलाब सुरू झाला. यामुळे सोमवारी मध्यरात्री सुमारे 14 विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर पुन्हा सकाळी शाळेतील सुमारे 25 मुलेदेखील अस्वस्थ झाल्याने त्यांना चिकोडी सरकारी हॉस्पिटल व शाळेमध्ये वैद्यकीय उपचार देण्यात आले. सुमारे 39 विद्यार्थ्यांना उलटी व जुलाब चा त्रास सुरू झाल्याने यातील 19 जणांना ओपीडीमध्ये उपचार करण्यात आले तर 13 जणांवर शाळेमध्येच उपचार करण्यात येत आहे. यातील सातजण अद्यापही चिकोडी सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच चिकोडीचे तहसीलदार राजेश बुर्ली यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी तसेच आरोग्य खात्याच्या अधिकार्यांनी निवासी शाळेकडे धाव घेतली. सदर घटना विषबाधेमुळे झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. एका महिन्यापूर्वी याच निवासी शाळेत अन्नातून विषबाधा झाल्यामुळे सुमारे 120 विद्यार्थी अस्वस्थ झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी शाळेतील वॉर्डन व इतर कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच आमदार प्रकाश हुक्केरी यांच्यासह न्यायाधीशांनीदेखील भेट देऊन निवासी शाळेला भेट देऊन स्वच्छता राखण्याबरोबर व मुलांची काळजी घेण्याची सूचना केली होती.
आता पुन्हा याच निवासी शाळेत विषबाधा होऊन विद्यार्थी अत्यवस्थ झाल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या शाळेतील कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दुसरीकडे काही ग्रामस्थांनी सदर निवासी शाळा व्यवस्थित चालविण्यात यावी. अन्यथा, बंद करावी तसेच गरीब विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार्या कर्मचार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.