

बेळगाव : महापालिकेच्या सूचनांचे पालन न करता रस्त्यात भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या लोकांवर पोलिसांत तक्रार करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे. रविवारी (दि. 19) सकाळी कॉलेज रोड येथे कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या महिलेला सूचना करण्यात आली.
शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे महापालिकेने नसबंदीबरोबरच रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू केले आहे. तरीही अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांकडून लोकांना त्रास होत आहे. काही दिवसांपूर्वी मारुतीनगर येथील दोन वर्षाच्या बालिकेवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून तिच्या चेहऱ्याचे लचके तोडले होते. त्यामुळे महापालिकेने शहर परिसरात रस्त्यात भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यास बंदी आणली आहे. तसेच शहरात मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांना टाकाऊ मांस उघड्यावर टाकू नये अन्यथा परवाना रद्द करून कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बजावली आहे.
रविवारी सकाळी महापालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि खडेबाजार पोलिसांनी नार्वेकर गल्ली, गोंधळी गल्ली, कॉलेज रोड परिसरात पाहणी केली. त्यावेळी एक महिला भटक्या कुत्र्यांना रस्त्यातच खाऊ घालत असल्याचा आढळून आले. त्यामुळे तिला रस्त्यात कुत्र्यांना खाऊ घातला तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. भटक्या कुत्र्यांना रस्त्यात कोणी खाऊ घालत असेल तर 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.