बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण लागू करावे, त्याचबरोबर समाजाला सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी कर्नाटका मराठा फेडरेशनच्या वतीने आज (गुरुवार) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे करण्यात आली. यावेळी मराठा आरक्षणा संदर्भात आपणाला थोडा वेळ द्या, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.
बंगळूर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीला मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह राज्य पक्षाध्यक्ष नवीन कुमार कठीण तसेच अन्य मंत्रीही उपस्थित होते. या बैठकीदरम्यान कर्नाटक राज्य मराठा फेडरेशनच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी फेडरेशनचे राज्य अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी, मंत्री आर अशोक, मंत्री अश्वत नारायण, राज्य पक्षाध्यक्ष नवीन कुमार कठीण यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
यावेळी फेडरेशनचे राज्यअध्यक्ष गायकवाड म्हणाले की, विद्यमान कर्नाटक सरकारने मराठा समाज विकास प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र समाजाच्या आरक्षणाची आरक्षणाची मागणी आणि मराठा समाजाची मोठी लोकसंख्या असलेल्या बारा मतदारसंघात समाजाला उमेदवारी देण्याबाबत भाजपने अद्याप निर्णय घेतलेला नाही. दोन खासदार, दोन विधान परिषद सदस्यांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे राज्यातील समस्त मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे. मराठा समाज नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. पक्षातील नेत्यांनीही मराठा समाजाचे महत्त्वाचे सहकार्य असल्याचे मान्य केले आहे. असे असतानाही मराठा समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. याकडे लक्ष देऊन सरकारने राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच महत्त्वाच्या मागण्याही मान्य कराव्यात, अशी विनंती गायकवाड यांनी केली. मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह पक्षाध्यक्ष नवीन कुमार कटील व अन्य मंत्र्यांनी निवेदनाचा स्वीकार केला. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक विचार करत आहे. मात्र आरक्षणाच्या मागणी संदर्भात सरकारला थोडा वेळ द्यावा, असे मुख्यमंत्री बाम्मई यांनी सांगितले.
यावेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष व माजी आमदार मनोहर कडोलकर, मोहन जाधव, भाऊसाहेब जाधव, माजी जि.पं.सदस्य धनश्री जांबोटकर, सुमित्रा उघळे, विनय कदम, मंगला काशीलकर, महेश रेडेकर, अनिल माने, भाऊसाहेब शिंगटे, विठ्ठल वाघमोडे, संजय पाटील यांच्यासह बेंगळुरु, बेळगाव, निपाणी, अथणी, चिकोडी, जमखंडी, हल्याळ येथील पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :