बेळगाव : सलग चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत रोज दोन फुटांनी वाढ होत आहे. शुक्रवारी (दि. 27) जलाशयाची पाणीपातळी 2,466.50 फुटांवर पोहोचली. जलाशय तुंडुंब होण्यासाठी अजून 9 फूट पाण्याची गरज आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर पुढच्या आठवड्यात जलाशय भरण्याची शक्यता बळावली आहे.
दरवर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राकसकोप जलाशय तुडुंब होतो. यंदा पावसाने लवकर दमदार हजेरी लावल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत गेली. त्यामुळे, गेल्या चार दिवसातच राकसकोप जलाशय भरण्याच्या मार्गावर आहे. रोज दोन ते तीन फुटाने पाण्याची पातळी वाढत गेल्याने चार दिवसात 13 फूट पाणीसाठा राकसकोप जलाशयात जमा झाला आहे.
जलाशय तुडुंब झाल्यास दरवाजे उघडण्याशिवाय गत्यंतर नाही. दरवाजे उघडले तर मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. आजूबाजूच्या शिवारात पाणी फुगले तर पीके पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे जुलैमध्ये निर्माण होणारी पूरस्थिती यंदा जूनमध्ये अनुभवायला मिळेल.
22 जून : 2,453
23 जून : 2,456.09
24 जून : 2,461.70
25 जून : 2,464.80
26 जून : 2,466.50