File Photo
बेळगाव

Prajwal Revanna : माजी खासदार प्रज्वल रेवण्णाची तुरुंगातही अश्लील कृत्य; पेनड्राइव्हमध्ये सापडले १०० हून अधिक अश्लील व्हिडिओ

कारागृहातून अनेक महिलांना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल झाल्याचे उघड, तुरुंग वॉर्डनच्या सहभागाबाबत पोलिसांचा कसून तपास

पुढारी वृत्तसेवा

Prajwal Revanna prison case

चिकोडी, काशिनाथ सुळकुडे : बंगळूरु परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेला माजी खासदार आणि बलात्कार प्रकरणातील दोषी कैदी प्रज्वल रेवन्ना याच्या सेलमध्ये सापडलेल्या पेनड्राइव्हमध्ये सुमारे १०० अश्लील व्हिडिओ असल्याचा धक्कादायक प्रकार फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या अहवालातून उघडकीस आला आहे.

कारागृहातील टीव्हीवर पाहत होता अश्लील व्हिडिओ

प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आहे. देवेगौडा यांचा मुलगा एच. डी. रेवण्णा यांचा प्रज्वल मुलगा आहे. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा तो पुतण्या आहे. कारागृहात कैद्यांसाठी बसवलेल्या एलईडी टीव्हीला पेनड्राइव्ह जोडून प्रज्वल अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे परप्पना अग्रहारा पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. हा पेनड्राइव्ह नेमका कोणत्या वेळेत आणि कसा वापरला गेला, हे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा एफएसएल तज्ज्ञांची मदत मागितली असल्याचे समजते.

मोबाईलमधून १७३ वेगवेगळ्या फाईल्स जप्त

तपासणीदरम्यान प्रज्वलच्या मोबाईलमधून १७३ वेगवेगळ्या फाईल्स जप्त करण्यात आल्या असून, पेनड्राइव्हमध्ये १०० हून अधिक व्हिडिओ असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, तुरुंगात मिळालेल्या या मोबाईलचा वापर करून प्रज्वलने बाहेर काही महिलांना व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ कॉल केल्याची माहितीही पोलीस सूत्रांनी दिली आहे.

अहवालानंतर होणार कायदेशीर कारवाई

हा मोबाईल नेमका कोणाकडून पुरवला गेला, सुरक्षेला धाब्यावर बसवून तुरुंगाच्या आत कसा पोहोचवण्यात आला आणि कोणाкоणाशी संपर्क साधण्यात आला, या सर्व बाजूंचा पोलीस सखोल शोध घेत आहेत. एफएसएल अहवालातील तांत्रिक पुरावे आणि गोळा केलेल्या साक्षींच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

प्रज्वल रेवण्णा याला जन्मठेपेची शिक्षा

घरकाम करणाऱ्या महिलेवरील बलात्कार प्रकरणी बंगळूर लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने ऑगस्‍ट २०२५ मध्‍ये प्रज्वल रेवण्णा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच त्‍याला १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच पीडित महिलेला ७ लाख रुपये भरपाई देण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले होते. जवळ‍पास १४ महिन्यांत या प्रकरणाचा निकाल देण्यात आला होता. हासन जिल्ह्यातील होळेनरसीपूर येथील एका फार्महाऊसमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार प्रकरणी प्रज्वल रेवण्णा दोषी ठरला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT