Police deployment on Pune-Bangalore highway due to increase in water level of Ved Ganga
वेदगंगाची पाणीपातळी वाढल्याने पुणे-बंगळूर महामार्गावर पोलीस बंदोबस्त Pudhari Photo
बेळगाव

निपाणी : वेदगंगेची पाणीपातळी वाढल्याने पुणे-बंगळूर महामार्गावर पोलिस बंदोबस्त

करण शिंदे

निपाणी, पुढारी वृत्तसेवा : कोकणात पावसाचा जोर वाढल्याने रविवारी (दि.21) सायंकाळी वेदगंगा आणि दूधगंगा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गासह तालुक्यातील वेदगंगेवर पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे. या दरम्यान चार बंधाराच्या ठिकाणी पोलीस आणि होमगार्ड कर्मचारी बंदोबस्तासाठी रात्री 8 वाजल्यापासून तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती सीपीआय बी.एस.तळवार यांनी दिली.

वेदगंगा आणि दूधगंगा या दोन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणात कोकणातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही नद्यांचे पाणी महामार्गालगत शेत शिवारात विस्तारले आहे. मागील चार दिवसापासून वेदगंगेवरील जत्राट-भिवशी, भोजवाडी-कुन्नूर, अकोळ- सिदनाळ, कारदगा-भोज हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. महामार्गावरील यमगर्णी वेदगंगा नदीपूल, मांगुर फाटा, कोगनोळी टोलनाका आणि दूधगंगा नदीपूल येथे होमगार्ड कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.

यावेळी रात्री विशेष पथकेही कार्यरत करण्यात आली आहेत. याची खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार हा बंदोबस्त ठेवला आहे. सध्यास्थितीत पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. त्यामुळे सर्विस रोडने वाहतूक सुरू असून पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे अपघातांसह पावसामुळे कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी तातडीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती सीपीआय तळवार यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.

SCROLL FOR NEXT