कारवार (पुढारी वृत्तसेवा):
१.१५ कोटी रुपयांचा दरोडा व अपहरण प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यालाच अटक करण्यात आली आहे. मंगळूर पोलिसांनी कारवार रहदारी पोलिस ठाण्यात कर्त्यत्वावर असलेल्या कॉन्स्टेबल श्रीशैलला अटक केली आहे.
दावणगिरीहून मंगळूरला नेण्यात येणाऱ्या पैशांची लूट करण्याच्या उद्देशाने सत्यनारायण नामक व्यक्तीचे अपहरण करून त्याच्याकडून १.१५ कोटी रुपये लुटण्यात आले. सत्यनारायणाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे मंगळूर पोलिसांनी तपास सुरू केला असता श्रीशैल हा या अपहरणामागे असल्याचे उघडकीस आले. त्याने कारवारमधील तरुणांचा वापर करून अपहरणाचा कट रचल्याचा संशय आहे.
कारवार तालुक्यातील किन्नर गावातील गणेश कोळंकर नामक तरुणाचा या गुन्ह्यासाठी वापर करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आधीच तीन संशयितांना अटक केली असून मुख्य संशयित मानला जाणाऱ्या गणेशचा शोध सुरू आहे. अटकेनंतर कारवार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीपान यांनी कॉन्स्टेबल श्रीशैल यांना निलंबित केले आहे.