निपाणीत झबला गॅंग सक्रिय; शाहूनगरात घरफोडीचे प्रयत्न अयशस्वी 
बेळगाव

Nipani Crime : निपाणीत झबला गॅंग सक्रिय; शाहूनगरात घरफोडीचे प्रयत्न अयशस्वी

पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेमुळे पाच घरफोड्या टळल्या; सीसीटीव्हीत टोळी कैद

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : निपाणी शहर व परिसरात घरफोड्यांच्या मालिकेमुळे नागरिकांची झोप उडवणारी झबला गॅंग कार्यरत झाल्याचे उघड झाले आहे. या टोळीने रविवारी (दि.१५) मध्यरात्री शाहूनगर येथील हनुमान मंदिर परिसरात पाच ते सहा घरफोडीचे प्रयत्न केले. मात्र, नागरिकांनी दाखवलेली जागरूकता व पोलिसांची तातडीची हालचाल यामुळे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या चोरट्यांचे हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती अशी, शाहूनगरातील रहिवासी शिवानंद नाईक व पत्रकार मधुकर पाटील, निहाल पटेल, बागवान सर यांच्या घरावर ही टोळी पहाटे २.४० वाजण्याच्या सुमारास दिसून आली. दोन चोरट्यांनी बाहेरील दाराची कडी तोडण्याचा प्रयत्न केला, तर आणखी तिघांनी नाईक यांच्या घराच्या खिडकीतून घुसण्याचा प्रयत्न केला. खिडकीतून बाहेर डोकावले असता अंगावर काळ्या रंगाचा झबला परिधान केलेले बुरखाधारी चोरटे दिसले. त्यांचा वेश पाहून क्षणभर घरातील सदस्य भयभीत झाले.

दरम्यान, माहिती मिळताच सीपीआय बी. एस. तळवार यांनी तातडीने कारवाई करत उपनिरीक्षिका एस. एस. नरसपन्नावर, हवालदार अमर चंदनशिव, बसवराज नेर्ली, बी. के. पाटील, गजानन भोई यांच्यासह सात कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पाठवला. पोलिसांनी परिसरात तासभर कोंबिंग ऑपरेशन राबविले. मात्र चोरटे हनुमान मंदिर रोड मार्गे खंडोबा मंदिराच्या दिशेने पसार झाले. नागरिक व पोलिसांनी दाखवलेल्या सजगतेमुळे पाच ते सहा घरफोड्या थोडक्यात टळल्या.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना सावधान राहण्याचे व रात्री अनोळखी हालचाली आढळल्यास तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान, शाहूनगर परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.

झबला गॅंगचा भितीदायक पोशाख

या गॅंगमधील चोरटे अंगावर पूर्ण काळ्या रंगाचा झबला परिधान करून घरफोडी करत असल्याचे समोर आले आहे. डोक्यापासून पायापर्यंत काळा पोशाख असल्याने त्यांना पाहिल्यावर कुणालाही भीती वाटावी. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही टोळी निपाणी परिसरात नवीनच दाखल झाल्याचे दिसत असून, “लवकरच या चोरट्यांना जेरबंद करू,” असा विश्वास सीपीआय बी. एस. तळवार यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT