

सोलापूर : घरफोडी, वाहनचोरी करणार्या तीन आंतरराज्य गुन्हेगारांना सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून एक पिस्टल, चोरी केलेली स्कॉर्पिओ, चांदीचे दागिने असा सहा लाख 21 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याजवळील पिस्टल हे विकण्यासाठी आणले असल्याचे आरोपींनी सांगितले.
विनापरवाना तसेच अवैधरीत्या पिस्टल, रिव्हॉल्वर, बाळगणार्या इसमांवर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई सुरू करण्यात आली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी समजली की काही इसम अक्कलकोट रोडवरील वळसंगवाडा हॉटेल येथून देशीबनावटीचे पिस्टल घेऊन निळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून निघाले आहेत. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांच्या पथकाने स्कॉपिर्ओमधील तिघांना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्यांच्यावर वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी तीन गुन्हे केल्याचे कबूल केले. होटगी येथील सराफाचे दुकान उचकटून घरफोडी केली. त्यांनी आणलेली स्कॉर्पिओ ही सातारा येथून चोरली होती तर उरळी कांचन येथून एक इको गाडी चोरल्याची सांगितले. त्यांच्याकडून पिस्टल, चांदीचे दागिने, चारचाकी गाडी असा सहा लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी सहा. पोलिस निरीक्षक विशाल वायकर, सूरज निंबाळकर, प्रकाश कारटकर, सलीम बागवान, विजय भरले, विरेश कलशेट्टी, बाळराजे घाडगे, सागर ढोरे-पाटील, अन्वर अत्तार, हरिष थोरात, राहुल दोरकर, समर्थ गाजरे, यश देवकते, योगेश जाधव, दिलीप थोरात, सुनील पवार, अनिल सनगल्ले, रविराज कांबळे, व्हनमोरे यांनी पार पाडली.