अमित रोकडे (Pudhari File Photo)
बेळगाव

Dead Body Found After 26 days | 26 दिवसांनी सापडला जीवन संपविलेल्या वेटरचा मृतदेह

महाराष्ट्रात घेतली होती नदीत उडी : मृत भुदरगड येथील : निपाणी पोलीसात नोंद

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : गेल्या 26 दिवसापूर्वी दारूच्या नशेत महाराष्ट्र हद्दीत वेदगंगा नदीत उडी घेऊन जीवन संपविलेल्या वेटरचा मृतदेह बुधवार दि. 16 रोजी कुन्नूर-भोज या वेदगंगा पात्रात पुलाजवळ निपाणी ग्रामीण पोलिसांना आढळून आला. अमित तानाजी रोकडे (वय 25 रा. देवकेवाडी ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असेजीवन संपविलेल्या वेटरचे नाव आहे. घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत अमित रोकडे हा कागल येथील हॉटेल अशोकामध्ये कामाला होता. दि. 21 जुन रोजी तो दुचाकीवरून सुट्टीवर आपल्या मूळगावी जात होता. दरम्यान कुर (ता.भुदरगड) येथील वेदगंगा नदीच्या पुलावर आल्यानंतर त्याने आपली दुचाकी पुलावर पार्क करून दारुच्या नशेत वेदगंगा नदीत उडी घेतली होती. दरम्यान ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती दुचाकी नंबरच्या आधारे कुटुंबासह पोलिसांना दिली. त्यानुसार दि.22 रोजी मयत अमित याचे वडील तानाजी विठोबा रुकडे यांनी भुदरगड पोलीस याबाबतची रितसर फिर्याद दिली होती. त्यानंतर भुदरगड व कागल पोलीसांनी निपाणी पोलिसांच्या संपर्कात राहत सदर आत्महत्या केलेल्या अमित याचा वेदगंगा नदीकाठ परिसरात तपास चालवला होता. मात्र प्रशासनाला अपयश आले होते.

दरम्यान अमित याची ओळख पटवण्यासाठी त्याचा फोटो भुदरगड पोलिसांनी निपाणी पोलिसांकडे एफआयरसह फोटो पाठवला होता. ज्यादिवशी अमितने नदीत उडी घेतली होती त्यावेळी त्याच्या अंगावर असलेल्या कपड्याच्या आधारे भुदरगड, कागल पोलीस प्रशासनाने अमितचा शोध चालवला होता. दरम्यान बुधवारी कुन्नूर-भोज वेदगंगा पुलामध्ये पाण्याच्या प्रवाहातून वाहत आलेल्या झाडाच्या व वेलीच्यामध्ये एक मृतदेह असल्याचे ग्रामीण पोलिसांच्या बीट पथकाला दिसून आले.

त्यानुसार याची माहिती सीपीआय बी. एस. तळवार, ग्रामीणचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, हवालदार प्रभू सिद्धाठगीमठ यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढून अमित रोकडे यांच्या कुटुंबियांना पाचारण करून मृतदेहाची ओळख पटवली. घटनास्थळी रीतसर पंचनामा करून सडलेल्या अवस्थेतील मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.याबाबत अमित याचे वडील तानाजी रोकडे यांनी दारुच्या नशेत आपल्या मुलाने उडी घेतल्याची फिर्याद दिली त्यानुसार भुदरगड पोलीसांकरवी हा गुन्हा निपाणी ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास नाईकवाडी यांनी चालवला आहे.

26 दिवस दोन्ही राज्यांची प्रशासन यंत्रणा नदी काठावर..

दि. 21 रोजी अमित रोकडे याने नदीत उडी घेतल्यानंतर भुदरगड, कागल व निपाणी पोलीस यंत्रणा गेल्या 26 दिवसापासून नदीकाठावर लक्ष ठेवून होती. यामध्ये बीट पोलीस कर्मचार्‍यांना उडी घेतलेल्या अमित रोकडे याची सविस्तर माहिती दिली होती. अखेर 26 दिवसानंतर अमितचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून त्यांच्या वडिलांसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT