निपाणी : रेशनच्या तांदळाची तस्करी करणार्या दोघांवर कारवाई करुन सुमारे 50 हजार रुपये किमतीचा 1,500 किलो तांदूळ व दोन वाहने असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. तालुका आहार निरीक्षक व पोलिस प्रशासनाने मंगळवारी (दि. 8) रात्री उशिरा निपाणी-चिकोडी मार्गावर रामपूर क्रॉसनजीक ही कारवाई केली. अदनान पटेल (रा. शिंदेनगर) व आकाश घाटगे (रा. जिजामाता चौक, निपाणी) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, लखनापूर परिसरातून वरील संशयित रेशन तांदळाची कमी दराने खरेदी करुन त्याची चढ्या दराने बाजारात विक्री करण्यासाठी कार व रिक्षातून पोती घेऊन जात असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्यासह पोलिसांनी मिळाली. त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा खात्याचे तालुका आहार निरीक्षक अभिजित गायकवाड, बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे साहाय्यक उपनिरीक्षक अर्जुन कुंभार, आहार खात्याचे कर्मचारी आकाश घुगरे, स्वप्नील शिंदे, जितेंद्र पाटील तलाठी सचिन जाधव यांनी पाठलाग करुन पटेल व घाटगे यांची वाहने अडविली.
त्यांची तपासणी केली असता वाहनात रेशनवर विक्री होणारा तांदूळ आढळून आला. त्यानुसार दोघांवर बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री दोघांनाही निपाणी न्यायालयापुढे हजर करण्यात आले.