Belagavi Woman Gold Bangle
निपाणी : प्रामाणिकपणा आजही जिवंत असल्याचे उदाहरण निपाणी शहरात पाहायला मिळाले. बेळगाव येथून देवदर्शनासाठी कुंभोज (ता. हातकणंगले) येथे जात असलेल्या महिलेची सुमारे तीन लाख रुपये किंमतीची सोन्याची बांगडी हरवली होती. मात्र निपाणीतील एका पीयूसी सेंटरमधील कर्मचाऱ्याने ती बांगडी शोधून काढत ओळख पटवून प्रामाणिकपणे परत केली. शुक्रवारी ही घटना घडली.
बेळगाव येथील सदाशिवनगर परिसरातील जैन मंदिराजवळ राहणाऱ्या आयुषी खोडा या आपल्या कुटुंबीयांसह कारने कुंभोज येथे देवदर्शनासाठी जात होत्या. महामार्गावरील चव्हाण मळा परिसरातील चिंदीपिर दर्ग्याजवळ असलेल्या पुरवंत बंधू यांच्या पीयूसी सेंटरवर त्यांनी वाहन तपासणीसाठी कार थांबविली. तपासणी पूर्ण झाल्यानंतर खोडा कुटुंबीय पुढील प्रवासासाठी निघाले.
काही अंतर गेल्यानंतर आयुषी यांच्या हातातील एक सोन्याची बांगडी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तातडीने पीयूसी सेंटरचे मालक पुरवंत यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला व घटनेची माहिती दिली. त्यानंतर पुरवंत यांनी तेथील कर्मचारी प्रदीप मारुती येजरे (वय २२, रा. प्रगतीनगर, निपाणी) याला चौकशी करण्यास सांगितले. प्रदीप येजरे यांनी तत्काळ सेंटरबाहेर येऊन कार उभी होती त्या ठिकाणी परिसराची पाहणी केली. त्यावेळी रस्त्यालगत सोन्याची बांगडी पडलेली त्यांना आढळली. त्यांनी ती सुरक्षित ठेवून संबंधित कुटुंबाशी संपर्क साधला. दरम्यान, खोडा कुटुंबीयांनी देवदर्शन उरकून परतीच्या प्रवासात निपाणी येथे येत बांगडी ताब्यात घेतली.
सुमारे तीन लाख रुपये किंमतीची बांगडी परत मिळाल्याने खोडा कुटुंबीयांनी प्रदीप येजरे यांचे मनापासून आभार मानले. त्यांनी कृतज्ञतेपोटी बक्षीस देऊ केले; मात्र प्रदीप यांनी ती रक्कम नम्रपणे नाकारत आपला प्रामाणिकपणा जपला.
गेल्या चार वर्षांपासून पुरवंत यांच्या पीयूसी सेंटरमध्ये कार्यरत असलेले प्रदीप येजरे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकतेचे निपाणी परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीमुळे समाजात विश्वास आणि नैतिक मूल्ये आजही जिवंत असल्याचा संदेश मिळाला आहे.
मुळातच पियूसी सेंटरमधील कर्मचारी प्रदिप येजरे हा कर्मचारी खासगी असून कसातरी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल एवढा जेमतेम पगार त्याला मिळतो. असे असताना त्याचा प्रामाणिकपणा हा मुळात आहेच. आणि अशा परिस्थितीत त्याने तीन लाखाची बांगडी परत केलीच शिवाय बक्षीस ही नाकारले यावरून त्याचा प्रामाणिकतेचा आदर्श दिसून येतो.