

निपाणी:पुढारी वृत्तसेवा भोपगाव-घाट पुणे रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात नजीकच्या यमगर्णी (मोरे मळा) येथील अभियंता युवक जागीच ठार झाला.तर दुचाकीवर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नीसह व दोन मुले जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री झाला घटनेची नोंद भोपगाव घाट पुणे पोलीसात झाली आहे.अभिजीत अर्जुन मोरे (वय ४१) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे यमगर्णी येथील मोरे मळा परिसरावर शोककळा पसरला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,मयत अभिजीत मोरे याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे निपाणी अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालय तर महाविद्यालयातीन शिक्षण पुणे येथे झाल्यानंतर तो पुणे येथील एका कंपनीत कामावर रुजू झाल्याने तो आपल्या पत्नी व मुलासमवेत पुणे येथे राहावयास होता. तर त्याचे आई, वडिल मूळगावी राहत होते. दरम्यान रविवारी सायंकाळी तो आपल्या पत्नी व दोन मुलासमवेत दुचाकीवरून देवदर्शन करून आपल्या घरी परतत असताना मागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली.यामध्ये दुचाकीवरील अभिजीत हा जागीच ठार झाला तर त्यांच्या पत्नी स्नेहा, मुले शार्दुल व अद्वैत हे तिघे जखमी झाले.
दरम्यान जखमी तिघांना पोलीसांनी तातडीने पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यामध्ये शार्दुल याचा उजवा पाय निकामी झाला आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मयत व जखमीची ओळख पटवीत याची माहिती कुटुंबियांना दिली.त्यानुसार मयत अभिजीत मोरे यांच्या कुटुंबियासह नातेवाईकांनी पुणे येथे धाव घेतली. सोमवारी रात्री उशिरा अभिजीत मोरे यांच्यावर मूळगावी यमगर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी त्याच्या शालेय मित्रपरिवारासह नातेवाईक उपस्थित होते. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा ठरला.
कुटुंबाचा आधारच गेला...
मयत अभिजीत मोरे हा अत्यंत मनमिळावू व हळव्या स्वभावाचा होता. त्यांनी अत्यंत गरिबीतून शिक्षण घेत नोकरी मिळवली होती. त्यामुळे त्याचा कुटुंबाला मोठा आधार होता.त्याच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाचा आधारच निघून गेला आहे.