निपाणी : शहराबाहेरील अष्टविनायकनगर येथील बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे 30 लाख रु. किमतीचे 22 तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच 10 हजार असा ऐवज लंपास केला. सदर बंगला माजी सैनिक राजू घाटगे यांचा आहे.
मुख्य रस्त्याला लागून असलेल्या या बंगल्यात धाडसी चोरीची घटना घडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. बसवेश्वर चौक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करून तपास चालविला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, मूळचे कणगला (ता. हुक्केरी) येथील राजू घाटगे गेल्या 25 वर्षांपासून अष्टविनायकनगर येथे वास्तव्यास आहेत. घाटगे यांच्या सासर्याचे निधन झाल्याने ते मंगळवारी कुटुंबीयांसमवेत बंगल्या कुलुप लावून इस्लामपूरला (ता. वाळवा) गेले होते. बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास ते परत आले असता बंगल्याचे दार उघडे दिसले. घाटगे यांनी बंगल्यात जाऊन पाहिले असता चोरट्यांनी तीन तिजोर्या फोडून 22 तोळे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने तसेच 10 हजार लांबवल्याचे दिसून आले. चोरट्यांनी लांबवलेल्या ऐवजामध्ये 8 तोळ्याचा लक्ष्मी हार, 5 तोळ्याच्या 2 चेन, 2 तोळ्याच्या 3 अंगठ्या तसेच साडेतीन तोळ्याचे सोन्याचे कडे, मंगळसूत्र, झुमके, सोन्याच्या रिंग, चांदीचा मेकला यांचा समावेश आहे.
चोरी झाल्याची खातरजमा झाल्यानंतर घाटगे यांनी तातडीने बसवेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. घटनास्थळी डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार प्रशांत कुदरी यांच्यासह एलसीबी पथकाचे कर्मचारी रोहन मदने, एम. ए. तेरदाळ, राजू दिवटे यांनी पाहणी करून पंचनामा केला.
गेल्या दोन वर्षात निपाणी सर्कलमध्ये असलेल्या चारही पोलिस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत लहानमोठ्या सुमारे 150 घरफोड्या झाल्या असून एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, राजू घाटगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनिरीक्षक रमेश पवार यांनी तपास चालविला आहे.
चोरट्यांनी घाटगे यांच्या बंगल्यासमोर असलेल्या लोखंडी गेटवरून उडी मारून आत प्रवेश करत दरवाजाचे कुलूप व सेंटर लॉक तोडून ऐवज लंपास केला. चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम वगळता बंगल्यासमोर असलेल्या दोन दुचाकी लॅपटॉप तसेच इतर कोणत्याही वस्तूला हात लावला नाही
घाटगे यांचा बंगला मुख्य रोडला लागून आहे. त्यामुळे त्यांच्या बंगल्याच्या दोन्ही बाजूला खुली जागा असून मागे दुसरा बंगला आहे. त्यामुळे शेजार्यांना कोणतीही जाणीव अथवा चाहूल होणार नाही, याची खबरदारी घेत माहीतगार चोट्यांनी ऐवज लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.