कारदगा : एजंटांना 2 लाख देऊन लग्न ठरवले. लग्न झाले, पूजा झाली. त्यानंतर नववधू पाच दिवस कशीबशी राहिली. त्यानंतर दागिने कपडे घेऊन गेली ती माघारी आलीच नाही. फोन बंद, घरच्यांचा पत्ता नाही. नवरदेवाने एजंटाशी संपर्क साधला पण त्यांच्याकडूनही उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता त्याने मध्यस्थींना धारेवर धरताच तडजोड करून प्रकरण मिटविण्यात आले. निपाणी तालुक्यातील एका गावातील दोन तर चिकोडी तालुक्यातील एका गावातील युवकाला मिरजमधील दाम्पत्य व इचलकरंजीतील एका एजंटाने लग्नाचे आमिष दाखवून गंडा घातल्याची चर्चा सुरू आहे.
निपाणी तालुक्यातील एका गावातील दोघे युवक लग्नासाठी मुली पाहत होते. लग्न ठरविणार्या एजंटांनी त्यांच्याशी संपर्क साधून मुली दाखविण्याचे आश्वासन दिले. त्या एजंटांनी गावातीलच दोघांना हाताशी धरून गोकाक येथे मुली आहेत. पण, भरमसाठ पैसे द्यावे लागती, असे सांगितले. त्या युवकांनी होकार दिल्यानंतर मुली दाखवल्या, याद्या केल्या आणि लग्नाच बार उडविण्यात आला.
लग्नानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, नववधूंच्या मनात वेगळेच चालले होते. बॅगेत सोने, साड्या भरून नववधू पलायनाच्या प्रतीक्षेत होत्या. अखेर ठरल्याप्रमाणे पाच दिवस माहेरी जातो म्हणून गेल्या त्या माघारी परतल्याच नाहीत. त्यामुळे नवरदेवांनी नववधू तसेच एजंटाशी संपर्क साधला. पण काही फायदा झाला नाही. नवरदेवांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मध्यस्थी व्यक्तीला धारेवर धरले व आपले पैसे व सोने परत देण्यास सांगून कारवाई करण्याचा इशारा दिला. अखेर मध्यस्थीने पैशांची तजवीज करून हे प्रकरण मिटवले, असल्याचे बोलले जात आहे.