निपाणी : शहर व परिसरातील ग्रामीण भागात 22 सप्टेंबरपासून जातनिहाय जनगणना सुरू झाली आहे. मात्र पहिले दोन दिवस जनगणनेसाठी देण्यात आलेले अॅप सुरू न झाल्याने गणती झाली नाही. त्यानंतर काही गणतीदारांच्या मोबाईलमध्ये अॅप सुरू झाले. मात्र अचानक मध्येच अॅप बंद होणे, सर्व्हर समस्या, लोकेशन चुकीचे दाखवणे अशी समस्या निर्माण झाली. शनिवारी दिवसभर पाऊस असल्याने गणतीदार शिक्षक वैतागले होते. त्यामुळे गणतीच्या कामाला वेग येईनासा झाला आहे.
गेल्या चार-पाच दिवसांमध्ये अनेक भागात सर्व्हर डाऊनमुळे नोंदणीच झालेल्या नाहीत. शिक्षकांना मोबाईलवर ओटीपी मिळण्यापासून माहिती अपलोड करताना अचानक सर्व्हर जात असल्याने पुन्हा नव्याने माहिती भरावी लागत आहे. अॅपमध्ये एका कुटुंबाची 60 प्रश्नांद्वारे माहिती नोंदणी करावी लागणार असल्याने बराच वेळ लागतो.
शिक्षकांना ते ज्या ठिकाणी सेवेत आहेत, येथील गणतीचे काम दसरा सुट्टी काळात देण्यात आले आहे. मात्र पहिले चार दिवस अनेक गणतीदार शिक्षकांकडून तांत्रिक अडचणीमुळे एकही नोंदणी झालेली नाही. शिक्षकांना गणतीसाठी कुटुंबांची यादी देणे आवश्यक आहे. त्यावरून सहज पत्ता लागणे शक्य असताना नावांची यादी न देता युएचआरडी क्रमांकाद्वारे कुटुंबांचा शोध घेण्याचे काम करावे लागत आहे.
7 ऑक्टोबरअखेर गणतीचे काम पूर्ण करावे लागणार आहे. मात्र पहिले चार दिवस तांत्रिक अडचणीमुळे वाया गेल्यानंतर पुढील काम वेळेत होईल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. एका कुटुंबाच्या गणतीसाठी किमान एक तास वेळ लागतो. प्रत्येक गणतीदारास दररोज 10 कुटुंबांची गणती करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत. मात्र तालुक्यातील अनेक गणतीदारांनी चार दिवसांत एकही कुटुंबाची गणती केलेली नाही. त्यामुळे उर्वरित दहा दिवसांमध्ये 150 कुटुंबांची गणती होणे अडचणीचे ठरत आहे.
जीपीएसद्वारे घरे शोधताना शिक्षकांना अडचणी येत आहेत. गणती करण्यात येणार्या घरांच्या कुटुंब प्रमुखांच्या नावासह घरांची यादी मिळाल्यास सोयीचे होते. अॅप व्यवस्थित चालत नसल्याने गैरसोय होत असून संबंधित कर्मचार्यांना एक मास्टरपीन देऊन नवीन अॅपद्वारे सर्व्हेचे काम सुरू करण्यासाठी संबंधित विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.