निपाणी : निपाणीसह परिसरात मंगळवारी रात्री व बुधवारी दिवसभर अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांची 'कभी खुशी कभी गम' अशी अवस्था झाली आहे. सध्या हा पाऊस तंबाखू पिकासह रब्बी पेरणीसाठी उपयुक्त ठरला आहे. तरीही सध्या अंतिम टप्प्यात असलेल्या सुगीला हा पाऊस मारक ठरला आहे. हा पाऊस तंबाखू पिकासाठी पोषक ठरला असला तरी पावसाचे प्रमाण वाढल्यास हाच पाऊस नुकसानीचा ठरण्याची शक्यता आहे.
निपाणी परिसरात सध्या तंबाखू लावणीची कामे पूर्ण झाली असून आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. सध्या तंबाखू पीक वाढीच्या दृष्टीने पावसाची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे हा पाऊस तंबाखू पिकासाठी पोषक ठरला आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे तंबाखू पिकाला रासायनिक खतांचा डोस देण्याच्या कामात शेतकरी गुंतले आहेत. परिसरात सोयाबीन काढणीची कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. काही दिवसांतच रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणी कामाला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा पाऊस उपयुक्त ठरल्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. सध्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची आहे. लगबग सुरू हा पाऊस असाच पुढे काही दिवस सुरू राहिल्यास तंबाखू पिकासाठी तो मारक ठरणार आहे. या पिकाला पाणी लागून पिकाचे नुकसान होणार आहे. खरीप हंगामातील सुगीची कामे पूर्णत्वाकडे आले आहेत. त्यात पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे.
सध्या शिवारात रब्बी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. सध्याचा पाऊस काही प्रमाणात तंबाखू पिकासाठी उपयुक्त ठरला असला तरी या पुढील काळात पाऊस झाल्यास तो तंबाखू पिकासाठी हानिकारक ठरणार आहे. पाऊस झाला तरी तो मुसळधार नसावा.
- निरंजन पाटील, तंबाखू उत्पादक, ममदापूर
खडकलाटसह परिसराला बुधवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाने झोडपून काढले. हा पाऊस तंबाखू पिकासह रब्बी पिकांच्या पेरणीला लाभदायक ठरला आहे. गेल्या १० दिवसांपूर्वीही परिसरात दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे तंबाखू पिकाला पोषक ठरला होता. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीची उष्णता होती. बुधवारी तासभर मेघगर्जनेसह पावसाने झोडपल्याने ओढे व नाल्यांना पाणी आले असून पिकांना पोषक वातावरण बनले आहे.